चंद्रपूर : देश-विदेशातील पर्यटकांना हमखास व्याघ्रदर्शनाची संधी असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रासह राज्यभरातील जंगलांत वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे लाखो हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे.
३७ हजार ६२३ नुकसानीची प्रकरणे शासनदरबारी दाखल झाली असून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २०२२ ते मार्च २०२३ पर्यंत ७ हजार २१ जनावरे ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. चराई क्षेत्रात घट, बिबट व वाघाची वाढती संख्या व अपुरे जंगल यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला असून शेतपिकांचे नुकसान होत आहे.
हेही वाचा – ‘मोखा’चा धोका विदर्भाला नाही; तापमानाने सरासरी ओलांडली, पारा ४५ अंशाच्या पार
राज्यातील व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि जंगलांतील नैसर्गिक गवताचे प्रमाण कमी झाल्याने वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी सुरू आहे, तर दुसरीकडे पाळीव जनावरे जंगलात जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जनावरांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे.
मागील काही वर्षात तृणभक्षक प्राण्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. विस्तृत वनक्षेत्र आता मर्यादित होऊ लागले आहे. पाळीव जनावरांची संख्या वाढून वनांवरील अवलंबनातदेखील वाढ झाली आहे. परिणामी, वनक्षेत्र घटल्याने तृणभक्षक प्राणी पिकांना लक्ष्य करीत आहेत. वन्यप्राण्यांमुळे लाखो हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. २०२२-२३ वर्षांत वन्यप्राण्यांकडून पिकांच्या नुकसानीची ३७ हजार ६२३ प्रकरणे दाखल झाली.
२०२०-२१ मध्ये पीकनुकसानीची ९७ हजार ७४२ प्रकरणांची नोंद झाली. २०२१-२२ मध्ये पीक नुकसानीच्या ८७ हजार ६७५ घटना घडल्याच्या नोंदी महाराष्ट्र वन विकास विभागाच्या संकेतस्थळावरील टिपणीत आहे. नुकसानीची भरपाई जलदगतीने मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये वनविभागाप्रती रोष आहे. वनांवरील अवलंबन कमी करून पुनर्वसन व जंगलालगतच्या शेताला कुंपण करणे, शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानातून सौरऊर्जा कुंपण-चेन लिक कुंपण दिले जात आहे. वनक्षेत्रात गुरे चरण्यासाठी जाऊ नयेत म्हणून मनरेगा व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतून गावागावांत ‘स्टॉल फीडिंग’ला चालना देणे सुरू आहे. नुकसान कमी करण्यासाठी पर्यायी पिकांबद्दल माहिती व प्रोत्साहन दिले जात आहे, असा दावा वन विभागाने केला.
वर्षनिहाय पशूधन हानी
वर्ष | जखमी | मृत्यू |
२०१९-२० | १०७ | ९६०० |
२०२०-२१ | १८३ | ९४५५ |
२०२१-२२ | ८१५ | १२१४५ |
२०२२-२३ | ५२२ | ७०२१ |