वर्धा : राज्य शासनाची लाडकी बहिण योजना सतत चर्चेत आहे. निवडणुकीत या योजनेचा हातभार लागल्याचे सर्व मान्य करतात.मात्र, सत्तेवर आल्यानंतर काही आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांना वगळण्यात आल्याने व योजनेसाठी भरभक्कम तरतूद झाल्याने लाडकी बहिण योजना चर्चेत आहे. आता त्या बहिणींपेक्षा आम्हालाच मदतीची गरज म्हणून महिलांचा एक मोठा वर्ग पुढे आला आहे. शासनाने आर्थिक सहाय्य करण्यासाठी पूर्वीच पात्र ठरविलेल्या या महिला म्हणजे एकल महिलांचा समूह होय.
एकल म्हणजे विधवा व परित्यक्ता महिला. पतीचा आधार नाही व समाज पण लक्ष देत नाही अशा लक्षावधी एकल महिला महाराष्ट्रात आहे. या वंचित महिलांनी आज मोर्चा काढून लक्ष वेधले. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. त्यापूर्वी महात्मा गांधी पुतळ्याजवळ घोषणाबाजी झाली.संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक तुषार उमाळे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चाच्या माध्यमातून काही मागण्या झाल्या. जीवन संघर्ष करीत असलेल्या या महिलांना शासनाने निराधार योजनेतून मासिक १५०० रुपये देणे सूरू केले. मात्र, ते कधीच वेळेवर मिळत नाही. दोन दोन महिने हे पैसे थकीत असतात.
शासनाने लाडकी बहिण योजनेत तर आर्थिक सक्षम महिलांना पण लाभ दिला आहे. पण त्यावर आमचा आक्षेप नाही. पण आमची थट्टा करू नका. शासनाने एकल महिलांसाठी नवी योजना तयार करावी. महिला व बालकल्याण खात्यातर्फे एकल महिलांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती दिल्या जात असते. पण दोन वर्षांपासून ती मिळाली नाही. अंगणवाडी, आशा वर्कर अशा भरतीत एकल महिलांना प्राधान्य मिळावे. व्यवसायासाठी ५ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळावे. दुर्बल महिलांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी १०० टक्के शिष्यवृत्ती दिली पाहिजे, अशा व अन्य मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनाच्या माध्यमातून एकल महिलांचे प्रश्न शासनापुढे उपस्थित करण्यात आल्याचे तुषार उमाळे म्हणाले.
जिल्ह्यातील चारही आमदारांना एका पत्रातून विनंती करण्यात आली आहे की त्यांनी सूरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात एकल महिलांच्या समस्या मांडाव्या. येत्या काळात या एकल महिलांचे मोठे संघटन राज्यभरात उभे केल्या जाईल. अत्यंत वंचित अशा या एकल महिलांना न्याय देण्यासाठी लढा उभारण्यात येणार, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.