नागपूर : शहराचे वैभव असलेला सक्करदरा तलाव कोरडाठाक पडला आहे. यात वर्षभर जलसाठा राहू शकेल यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. मात्र, सौंदर्यीकरणाच्या नावावर तलावाच्या दोन्ही बाजूला सिमेंटचा अतिरेक केला जात आहे.

भोसलेकालीन तलावापैकी एक असलेला सक्करदरा तलाव उन्हाळा लागण्यापूर्वीच आटला आहे. तलावात जलपर्णी वाढली आहे. या कचऱ्यामुळे जलचरांचे नुकसान झाले आहे. नागपूरच्या विकास आराखड्यात तलावाच्या आजूबाजूचा सर्व भाग रहिवासी क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आला असून अपवाद वगळता दक्षिण किनारा हरित क्षेत्र म्हणून राखीव आहे. सक्करदरा तलाव सुमारे ४ हेक्टर क्षेत्रात आहे. आता ते एखाद्या खेळाच्या मैदानासारखे दिसू लागले आहे. तलावात वर्षभर पाणी राहावे, याचा विचार कोणीच करत नाही. सक्करदरा तलावाभोवती बांधकाम झाल्याने तलाव परिसर आकुंचन पावत आहे. तलावात कचरा टाकला जाऊ नये म्हणून लोखंडी कठडे लावण्यात आले, तरीही लोक येथे कचरा टाकतात.

२०१९ मध्ये सक्करदरा सुशोभीकरण समितीने तलाव सफाईचे काम सुरू केले होते. जे फार काळ टिकू शकले नाही. तलावात मूर्ती व निर्माल्य विसर्जन करण्यास मज्जाव आहे. त्यासाठी लोखंडी कठडे बसवण्यात आले आहेत. तरी देखील तलावाच्या काठावर अनेक दिवसांपासून मूर्ती, निर्माल्य आणि कचऱ्याचे ढीग आहेत. या ऐतिहासिक तलावाच्या दुरवस्थेसाठी या भागातील लोकप्रतिनिधींसह, नागपूर सुधार प्रन्यासचे अधिकारी जबाबदार असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे.

सक्करदरा तलावाच्या काठावर सुरू असलेले बॉलिवूड सेंटर पॉईंट हॉटेल बंद झाले असून तेथील बांधकाम ध्वस्त करण्यात आले आहे. पण, त्याचा मलबा तलावाशेजारी असून त्या बाजूने भिंत उभारण्याचे काम सुरू आहे.

नागरिक काय म्हणतात?

सक्करदरा तलाव आणि शेजारचे उद्यान मिळून सौंदर्यीकरण करण्यात यावे. या तलावात वर्षभर जलासाठा राहावा तसेच येथे नौकाविहार सुरू करण्यात यावे.

संदीप शिरभाते

सक्करदरा तलाव आणि परिसर दक्षिण आणि पूर्व नागपूरसाठी पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होऊ शकते. तलावाशेजारी उद्यान आहे. तसेच जवळच दत्तात्रयनगर उद्यान आहे. याशिवाय तलावाच्या दुसऱ्या बाजूला बॉलिवूड सेंटर पॉईन्टची जागा आहे. हे सर्व मिळून एक चांगले पर्यटन स्थळ विकसित केले जाऊ शकते.

उमंग कोहळे