बुलढाणा: अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षा रब्बी हंगामावर केंद्रित झाल्या आहेत. यंदा साडेतीन लाखांवर पेरणीचे लक्ष्य असले तरी प्रतिकूल स्थितीमुळे हरभऱ्याचा पेरा वाढणार हे उघड आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी ही माहिती दिली.
यंदाचे पेरणी क्षेत्र ३ लक्ष ३६ हजार ४५३ हेक्टर इतके आहे. कमी पाऊस व धरणातील अपुऱ्या जलसाठ्यामुळे हरभऱ्याची विक्रमी लागवड होण्याची चिन्हे आहे. २ लाख २५ हजार हेक्टरवर हरभऱ्याची लागवड होण्याची शक्यता आहे. या खालोखाल गहू ६० हजार, गावरान ज्वारी २०, मका ३० हजार हेक्टर असे नियोजन आहे.
या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे कमीत कमी पाण्यावर येणाऱ्या रब्बी पिकांचे नियोजन करावे . ज्वारी, करडई, सूर्यफुल, मका, तीळ, जवस इत्यादी पिकांची पेरणी करावी, असा सल्ला ढगे यांनी दिला.