चंद्रपूर : सैराट या बहुचर्चित चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा नवा मराठी चित्रपट ‘घर बंदूक बिरयानी’ सात एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असून, यात मूल तालुक्यातील बेंबाळ येथील ललित मटाले याची महत्त्वाची भूमिका असल्याने झाडीपट्टीच्या रसिकांसाठी हा चित्रपट औत्सुक्याचा ठरला आहे.
चंद्रपूर येथे नुकतेच या चित्रपटाचे प्रमोशन झाले त्यासाठी ही सर्व मंडळी चंद्रपुरात आली होती. त्यांच्यासह स्टेजवर ललित मिरवणे ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानाची आहे, अशी चर्चा सर्वत्र होत आहे. ललितचे कुटुंब आता भंडारा जिल्ह्यात स्थायी झाले असले तरी ललितचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण बेंबाळलाच झाले. आता त्याने अभिनयात पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. पण अभिनयाचे बाळकडू त्याला बेंबाळ गावातच मिळाले असे तो मानतो. येथे झाडीपट्टीच्या नाटकांचे प्रयोग बघत तो वाढला. नाटकांच्या तालमी व नाटक बघून शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आवडत्या कलावंताच्या तो नकला करायचा. बेंबाळच्या विवेकानंद विद्यालयात असताना शालेय जीवनात युवराज चावरे या शिक्षकाने दिलेल्या प्रोत्साहनाचे तो आवर्जुन उल्लेख करतो. पुढे ब्रम्हपुरी येथील अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडून पुणेच्या ललित कला केंद्र मधून त्याने नाट्यशास्त्राची पदवी घेतली. पुण्यात काही वर्षे नाटकातून भूमिका केल्यानंतर बबन,अव्यक्त, मेडिसिन लॅम्प अशा काही चित्रपटांतून त्याने अभिनय केला. आता तो नागराज मंजुळे यांच्या आटपाट प्रोडक्शन व झी स्टुडिओच्या बॅनर खाली काम करीत असल्याने झाडीपट्टीचा गौरव वाढला आहे.
हेही वाचा – जुन्नरमधील विविध कार्यकारी सोसासयटीचे संचालक किशोर तांबे यांचा खून; दोघे गजाआड
हेही वाचा – उत्तरप्रदेशातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून पुण्यात तिघांवर खुनी हल्ला
ललित म्हणतो…
झाडीपट्टी रंगभूमी माझी प्रेरणा आहे. बेंबाळला असताना घनश्याम दयालवार यांच्या कॉमेडी रोलची नक्कल करायचो. पुढे किशोर उरकुंडवार यांच्या सान्निध्यात कलेचे संस्कार झाले त्यांची लेखन व नाटक बसविण्याची शैली मला प्रभावित करायची. नागराज मंजुळे यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकता आल्यात,ते नवोदितांना मित्रांसारखे वागवतात. पुढे वास्तविक जीवनातील विविध पात्र रंगमंच व चित्रपटांतून साकारण्याची इच्छा आहे.