गडचिरोली : संपत्तीसाठी सुपारी देऊन सासऱ्याची हत्या केल्याच्या आरोपाखाली ९ महिन्यांपूर्वी गडचिरोलीतील नगर रचना विभागाची तत्कालीन सहायक संचालक अर्चना पुट्टेवार हिला अटक झाली होती. त्यानंतर तिच्या कार्यकाळात पूरग्रस्त भागातील भूखंडांवर अकृषक परवाने रेवड्या- फुटाण्याप्रमाणे वाटप केल्याचे आरोप झाले होते. दरम्यान, अहेरीत भूमाफिया पुन्हा सक्रिय झाले असून पूररेेषेतील भूखंडाचे तुकडे पाडून अकृषक परवाने देण्याचा घाट घातला आहे.
शहरातील सर्व्हे क्र. १३८/१ (खाते क्रमांक १८९१) ४० हेक्टर आर, सर्व्हे क्र. १३८/२ (खाते क्रमांक १७४८) १.२० हेक्टर आर शेतजमीन एका महिलेने खरेदी केली आहे. सदर जमीन शेती करण्याच्या अटीवर शेतजमीन मालकांकडून विकत घेण्यात आली. मात्र, शेतजमीन लक्ष्मण नाल्याला लागून असून ती पूरग्रस्त असताना त्याठिकाणी भूखंड तयार करण्याचा घाट घातला जात आहे. चिकटून मोठा नाला असल्यामुळे व शहराचा उतार असलेली जमीन असल्याने दरवर्षी त्या शेतात पूर येतो.p त्यामुळे त्याठिकाणी घरे बांधणे धोक्याचे ठरू शकते. असे असतानाही
अनेक बेघर व गरजूंना हे धोकादायक भूखंड विक्री केल्यास त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांनी आक्षेप घेतला असून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सविस्तर तक्रार केली आहे. या ठिकाणच्या भूखंडाला अकृषक नाहकरत प्रमाणपत्र तसेच परवाने देऊ नयेत तसेच संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शेख यांनी केली आहे.
यापूर्वी झाले होते आंदोलन
पुट्टेवार प्रकरणानंतर जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, अहेरी, कुरखेडा येथील अकृषक परवाने संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. यातून मोठी उलाढाल झाल्याच्या तक्रारीही जिल्हा प्रशासनाकडे आल्या होत्या. माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अहेरीतील अकृषक परवान्यांवर बोट ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन केले होते. त्यानंतर भूमाफिया काही दिवस शांत होते, पण आता पुन्हा त्यांनी डोके वर काढल्याचे दिसत आहे.
अकृषक परवान्यांसाठी रेटकार्ड
अकृषक परवाने देण्यासाठी नगररचना विभागाकडून दर ठरलेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याआडून मोठी उलाढाल होते. भूमाफिया यंत्रणेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन अकृषक परवाने पदरात पाडून घेतात व त्यानंतर स्क्वेअर फूटच्या हिशेबाने भूखंड विक्री करुन मोठी कमाई करतात. या रेटकार्डची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.