बुलढाणा : जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील नियोजित २ स्मार्ट सिटी (कृषी समृद्धी केंद्र) साठी आवश्यक ३,३२८ हेक्टर जमिनीची मोजणी आता अंतिम टप्प्यात आहे. उपग्रहाच्या मदतीने तसेच पारंपरिक मानवी पद्धतीने ही मोजणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील लोणार, मेहकर, सिंदखेडराजा व देऊळगाव राजा या चार तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाची लांबी ८७ किलोमीटर इतकी आहे. भूसंपादन व अन्य कारणामुळे कागदोपत्री रखडलेल्या नियोजित नव नगरे (स्मार्ट सिटी) साठी ८ गावांतील तब्बल ३,३२८ हेक्टर जमिन लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात दोन नवनगरे प्रस्तावित असून त्याचे ‘कृषी समृद्धी केंद्र’ असे नामकरण करण्यात आले आहे. साब्रा-काब्रा (मेहकर) व सावरगाव माळ (सिंदखेड राजा) येथे ही केंद्रे उभारण्यात येणार आहे. साब्रा-काब्रा अंतर्गत उमरा, फैजलपूर, गोंढाळा, साब्रा, काब्रा या गावांचा समावेश आहे. या गावांतील १,३८२ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. सावरगाव माळ अंतर्गत गोळेगाव, निमखेड व सावरगाव माळमधील १,९४५ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यातील इतर गावांतील जमिनीची उपग्रहीय व मानवी पद्धतीने होणारी मोजणी पूर्ण झाली आहे.

हेही वाचा : तुम्ही दिव्यांग श्रेणीत आहात? तलाठी व्हायचंय? मग हमीपत्र…

हेही वाचा : रविकांत तुपकरांनी शिस्त पालन समितीसमोर जाण्याचे टाळले, राजू शेट्टींना पत्राद्वारे कळविल्या व्यथा

मागील काळात स्थानिकांच्या विरोधामुळे रखडलेली गोळेगाव येथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने करण्यात येणारी मोजणी सध्या सुरू आहे. ही मोजणी अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, गोळेगाव येथील मोजणी पूर्ण झाल्यावर स्मार्ट सिटीसाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी पूर्ण होणार आहे. यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तर्फे ३,३२८ हेक्टर जमिनीचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. हा महत्वाचा टप्पा पूर्ण झाल्यावर ‘लँड पुलिंग सिस्टीम’ ने या हजारो हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. यानंतर कृषी समृद्धी केंद्राच्या उभारणीस प्रारंभ होणार असल्याचे महामंडळाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Land mapping for smart city alongwith samruddhi highway in last stage satelites used scm 61 css
Show comments