सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नांना वास्तवाचे पंख लाभतील

नवीन वर्ष म्हणजे केवळ चार ऋतुंचा नवीन खेळ नाही. हा क्षण एका नव्या अध्यायाचा प्रारंभ असतो.  नवे स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद एकाचवेळी मनाला, घराला, शहराला खुणावत असते. मन आणि घरासह शहराच्याही ललाटावर नवउन्मेषी नाविण्याचा मंगल टीळा झगमगावा, अशी प्रत्येकच नागरिकाची मनस्वी अपेक्षा असते. या अपेक्षेवर आपले नागपूर खरे उतरतेय का, २०१९ च्या सूर्याची पहिली किरणे शहराचा उंबरठा स्पर्शताना नाविण्यपूर्ण असे काय घेऊन येणार आहेत, असे अनेक प्रश्न या नववर्षदिनी पडणे स्वाभाविक आहे. या प्रश्नाची उत्तरे नववर्षांच्या पहिल्याच दिनी नागपूरकरांना मिळावी, यासाठी लोकसत्ताने नवीन वर्षांत उपराजधानीकरांसाठी आनंदपर्वणी ठरणाऱ्या विषयांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेतला. त्यातून जे रचनात्मक संचित हाती लागले त्याचाच हा लेखाजोखा..खास लोकसत्ताच्या वाचकांसाठी!

मार्चमध्ये ‘भारतीय सफारी’अनुभवा

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय हा शहराची शान ठरणार आहे. या नवीन वर्षांत येथे ‘भारतीय सफारी’चा आनंद लुटता येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षीच गोरेवाडय़ासंदर्भात मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर २०१८ पर्यंत भारतीय सफारी व रात्र सफारीचे काम पूर्णत्वास नेण्याचे निर्देश दिले होते. त्याचे सकारात्मक परिणाम नवीन वर्षांत दिसणार आहेत. मुंबईच्या एस्सेलवर्ल्डला हे काम देण्यात आले आहे. जानेवारी २०१७ मध्ये एस्सेलचे अधिकारी गोरेवाडाची पाहणी करण्यासाठी आले होते आणि त्यांनी या प्रकल्पात काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले होते. एस्सेल वर्ल्डचे अधिकारी आर.पी. त्यागी आणि वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. रामबाबू यांच्यात सप्टेंबर २०१८ मध्ये करार झाला. ४५२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात  सरकार ५१ टक्के आणि एस्सेल ४९ टक्के अशी भागिदारी निश्चित झाली आहे. या समुहाने गोरेवाडय़ात काम देखील सुरू केले आहे. आधीच्या कंपनीच्या कामांमध्ये फारसे बदल न करता काम चांगले व अधिक गतीने कशी करता येईल, यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरू झाली आहे. या बदलानंतर मुख्यमंत्र्यांकडूनही ‘भारतीय सफारी’ सुरू करण्यासाठीची कालमर्यादा वाढवून घेण्यात आली. या भारतीय सफारीमध्ये बिबट सफारी, अस्वल सफारी, सिंह सफारी आणि वाघ सफारीचा समावेश आहे. प्रत्येकी २५ हेक्टरमध्ये ती केली जाणार आहे.

थेट रोबो शस्त्रक्रिया करणार

या नवीन वर्षांत प्रगत विज्ञानाचा चमत्कार दुर्धर आजाराशी लढ णाऱ्या नागपूरकरांनाही दिलासा देणार आहे. पारंपारिक शस्त्रक्रियेच्या पद्धतीला फाटा देवून उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) यंत्र मानव अर्थात रोबोट विविध गुंतागुंतीच्या लेप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया करताना दिसणार आहे. हा देशातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पहिला प्रकल्प आहे. शस्त्रक्रिया म्हटली की डॉक्टर हातात विविध वैद्यकीय शस्त्र घेऊन  उभे दिसतात. परंतु काही शस्त्रक्रियांमध्ये डॉक्टरांना मानवी शरीरात विशिष्ट भागापर्यंत पोहचताही येत नाही. अशा स्थितीत रुग्णांना जास्त रक्तस्त्रावाची जोखीम असते. मध्य भारतातील गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना या त्रासापासून नवीन वर्षांत दिलासा मिळणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीने नाविन्यपूर्ण योजनेतून १७ कोटी ६० लाख रुपये मेडिकलला दिले आहेत. या प्रकल्पाची लवकरच निविदा प्रक्रिया होवून नवीन वर्षांच्या पहिल्या किंवा दुसऱ्या महिन्यात काम सुरू होईल. त्यानंतर मेडिकलच्या तज्ज्ञ डॉक्टर शस्त्रक्रियागृहातील विशिष्ठ खोलीत संगणकावर बसून गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया रोबोटच्या मदतीने सहज करू शकणार आहेत.

क्रीडापटूंना सुसज्ज मैदान मिळतील

क्रीडापटूंसाठी नवीन वर्षांत आनंदाची बातमी आहे. शहरातील विविध भागात खेळायसाठी सुसज्ज मैदान मिळणार आहेत.  यासाठी मुख्यमंत्र्यांनी तब्बल ६० कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले आहे. नागपुरात प्रतिभावंत खेळाडूंचा अभाव नाही हे अनेक वेळ सिद्ध झाले आहे. कोणत्याच मूलभूत सुविधा नसतानाही येथील खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्तरावर नागपूरचे नाव मोठे केले आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरातील सहाही विधानसभा मतदार संघातील निवडक आणि उपयोगी मदाने निवडून त्यांचा विकास केला जाणार आहे. या कामाची जबाबदारी नागपूर सुधार प्रन्यासकडे सोपवण्यात आली आहे. त्यासुनार समितीने जवळपास ६० मदानांची जंबो यादी तयार केली आहे. या क्रीडांगणावर महिला पुरुष शौचालय,मदानाच्या चारही बाजूने सुरक्षा िभत,रात्रकालीन स्पध्रेसाठी दिवे, कपडे बदलण्यासाठी खोल्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुरक्षारक्षक आदींची व्यवस्था राहणार आहे. तसेच खो- खो,कबड्डी, क्रिकेट, व्हॉलिबॉल, एॅथलेटिक्स, फुटबॉल आदी खेळांच्या दृष्टीने क्रीडांगण विकसित केले जाणार आहेत.

स्वप्नातील मेट्रो वास्तवात धावणार

नागपूरकरांसाठी कधीकाळी स्वप्नवत असलेली मेट्रो रेल्वे या नवीन वर्षांत शहरात चौफेर धावणार आहे. २०१४ मध्ये नागपुरात मेट्रो प्रकल्पाची घोषणा झाली तेव्हा प्रकल्पाच्या पूर्णत्वाबाबतच शंका उपस्थित करण्यात आली होती. मात्र चार वर्षांत गतीने हा प्रकल्प उभा राहिला आहे. नवीन वर्षांत वर्धा मार्गावरील खापरी-बर्डी या टप्प्यावर मेट्रो धावेल. सर्वसाधारण दहा हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प शहराच्या सौंदर्यात आणि सार्वजनिक वाहतूक कोंडी दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. चककीत स्थानके, भव्य-दिव्य इमारती आणि देशी-विदेशी तंत्रज्ञानाची मदत हे या प्रकल्पाचे वैशिष्ट आहे. सध्या खापरी ते एअरपोर्ट (साऊथ) या जमिनीवरून धावणाऱ्या मेट्रोमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. पुढील दोन महिन्यात मेट्रोचा एलिव्हेटेड (जमिनीवरून)  प्रवास सुरू होईल. सध्या या मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. बर्डी ते खापरी या दरम्यान दहा पैकी सात स्थानकाची कामे मार्चपर्यंत पूर्ण करून मेट्रो सुरू करण्याचा महामेट्रो व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. यासाठी चीन येथे तयार करण्यात आलेले डब्बे मागवण्यात आले आहे. ते जानेवारी किंवा फेब्रुवारीमहिन्यात नागपुरात दाखल होणार आहे. मेट्रोविषयी सर्वाच्याच मनात कमालीची उत्सूकता आहे. ‘टयल रन’ (चाचणी)ला होणारी सर्वच वयोगटातील गर्दी यांचेच प्रतीक आहे.

साहित्य, रंगदेवतेचा गजर निनादणार

नवीन वर्षांत नागपूरकरांना साहित्य आणि सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे. जानेवारी महिन्याच्या प्रारंभी जागतिक मराठी अकादमीच्यावतीने शोध मराठी मनाचा या शीर्षकांतर्गत १६ व्या जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या जागतिक संमेलनाच्या निमित्ताने विविध देशात स्थायिक झालेले मराठी भाषिक उद्योजक आणि साहित्यावर प्रेम करणारे नागपूरनगरीत येणार असून त्यांचे अनुभव ते महोत्सवाच्या निमित्ताने रसिकासमोर मांडणार आहेत. या संमेलनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून रसिकांना या विभूतींच्या जीवनातील अनेक कडू-गोड आठवणी जाणून घेता येणार आहेत. नागपूरकर नाटयकलावंतांचे आणखी एक स्वप्न या नवीन वर्षांत पूर्ण होणार आहे. यंदाचे अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलन शहरात होत आहे. ३३ वर्षांनंतर नागपूरला हा बहूमान लाभला आहे.  २२ ते २५ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या नाटय़संमेलनात रंगभूमीच्या संदर्भात विविधांगी विषयांवर चर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. यानिमित्ताने नाटय़ आणि मराठी चित्रपटसृष्टीतील मांदियाळी शहर अनुभवणार आहे.

विद्यापीठाच्या अनेक योजनांची पूर्तता

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नवीन वर्षांत काही योजनांची पूर्तता होईल. अंबाझरी तलावाजवळील नवीन प्रशासकीय इमारतीत ऑगस्ट २०१९ पर्यंत विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विभागांना जागा देण्यात येईल. त्यामुळे विद्यापीठ परिसर, एलआयटी परिसर, विधि महाविद्यालय आणि जवळच असलेल्या वसतिगृहातील  विद्यार्थ्यांची एकाच परिसरात कामे होण्यास मदत होईल. दरवर्षी विद्यार्थी संख्या वाढतच असल्याने विद्यार्थ्यांच्या कमी खर्चातील निवासाची समस्या कायम असते. त्यामुळेच  २०० मुलांसाठी नवीन वसतिगृहाच्या कामास २०१९मध्ये सुरुवात होईल. राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत विद्यापीठ परिसरात ‘रुसा भवन’ साकारण्यात येणार आहे. याचे सात कोटी रुपये विद्यापीठाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द केले आहेत. याशिवाय सिंथेटिक ट्रॅकची घोषणा यापूर्वीच विद्यापीठाने केली असून बहुउद्देशीय स्पोर्ट कॉम्प्लेक्सविषयी जागेचा वाद असला तरी ते विद्यापीठाच्या जागेवरच उभे राहणार असून नवीन वर्षांत त्याच्या कामाला सुरुवात होईल. बहुउद्देशीय स्पोर्टस् कॉम्प्लेक्ससाठी केंद्राच्या स्पोर्टस् अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाकडून विद्यापीठाला निधी प्राप्त झाला आहे.

रामझुला-२ ;  मानाचा तुरा

रामझुला-२ आता लोकापर्णाला सज्ज झाला आहे. त्याचे दिमाखदार सौंदर्य शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरणार आहे. जयस्तंभ चौक ते मेयो रुग्णालयादरम्यान असलेल्या या पुलाचा दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण येत्या १९ जानेवारीला होत आहे. रेल्वे मार्गाने पूर्व आणि पश्चिम शहराची विभागणी झाली आहे. पुलाच्या एकीकडे जुने शहर आणि बाजारपेठ आणि दुसरीकडे सिव्हिल लाईन्स आहे. पूर्व आणि पश्चिम नागपूरला जोडणारा रामझुला हा दुवा ठरला आहे. या पुलावर आता थेट कस्तुरचंद पार्कवरून वाहने नेण्याची योजना आहे. त्यामुळे जयस्तंभ चौकातील वाहतुकीची कोंडी फुटणार आहे.  पथदीवे, केबल प्रोटेकशन आणि आकर्षक रंगरोटी यासारखी कामे अंतिम टप्प्यात असून जानेवारीच्या दुसऱ्या रविवारी दुसऱ्या बाजूने देखील वाहतूक सुरू होईल आणि खऱ्या अर्थाने राम झुला पूर्णत्वास येईल. रामझुलाचे कार्यादेश २५ जानेवारी २००६ ला देण्यात आले होते. पहिला टप्पा सुरू होण्यास आठ वर्ष लागले तर दुसरा टप्पा चार वर्षांत पूर्ण झाला. रामझुलासाठी थेट जपानवरून केबल मागण्यात आले आहेत. हे केबल नागपूरकरांच्या सुरक्षिततेची हमी देत पुलाचा भार खांद्यवर घेऊन ताठ मानेने उभे आहेत.

Story img Loader