अकोला : महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी अभिमानाचे प्रतीक असलेले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. अकोट येथील श्री शिवाजी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त अनोखी मानवंदना देण्यात आली. १८ हजार चौरस फुटावर शिवरायांची भव्य दिव्य प्रतिमा साकारण्यात आली आहे. गहू आणि मोहरी पिकाचा वापर करून अत्यंत देखणी कलाकृती साकारण्यात आली. अकोट येथील कलाकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांचे विचार पूजले जातात. त्यांचे युद्ध धोरण, मुत्सद्देगिरी, गनिमी कावा, शैली आणि प्रशासकीय कार्यक्षमता आजही सर्वांना प्रेरणा देतात. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर आनंदाने आणि अभिमानाने साजरी केली जाते. शिवरायांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याची आठवण करून देण्यासह त्यांचे प्रेरणादायी विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. अकोला जिल्ह्यात देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. 

दरम्यान, अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने संचालित अकोट येथील श्री शिवाजी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी विविध उपक्रम साजरे केले जातात. यावर्षी महाविद्यालयात शिवाजी महाराजांची भव्य दिव्य प्रतिमा निसर्गाच्या माध्यमातून साकारली आहे. महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व २५ विद्यार्थ्यांनी अवघ्या १५ दिवसाच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तयार केली आहे.

प्रतिमा साकारण्यासाठी चार क्विंटल गहू व ३५ किलो मोहरीचा वापर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची कलाकृती तयार करण्यासाठी चार क्विंटल गहू व ३५ किलो मोहरी लागली आहे. सर्वप्रथम श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानावर आखणी करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे रेखाटन करण्यात आले. त्यात गहू आणि मोहरी पेरण्यात आली. १५ दिवसांच्या कालावधीत गहू व मोहरीचे हिरवेगार पीक उगवले. त्या माध्यमातून ही भव्य दिव्य प्रतिमा साकारल्या गेली. महाराज जणू गडावरून खाली उतरून आले आहेत, असा हा देखावा या प्रतिमेतून दिसून येतो. ही प्रतिमा साकारण्यासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी, चतुर्भुज आर्टचे विद्यार्थी व महाविद्यालयाचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Story img Loader