वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या निघत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी त्रस्त झाले असून काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचीही माहिती आहे. दरम्यान, या विरोधात विद्यार्थ्यांनी काल रात्री विद्यापीठ परिसरात आंदोलन करत कारवाईची मागणी केली.
हेही वाचा – नागपूर: ११ महिन्यांच्या बाळासह आईने घेतली तलावात उडी
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असून येथील विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. दीड ते दोन महिन्यांपासून हा प्रकार सतत होत असल्याने विद्यार्थ्यांनी काल महाविद्यालय परिसरात आंदोलन केले. रात्री ९ वाजतापासून सुरू झालेले आंदोलन रात्री २ वाजेपर्यंत सुरू होते. यावेळी विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात येत होती. अखेर विद्यापीठ प्रशासनाने मध्यरात्री विद्यार्थ्यांशी चर्चा करून हे आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा – नागपूर : तरुणांमध्येही मणके विकाराचे प्रमाण वाढले ; जागतिक स्पाईन दिवस आज
दरम्यान, जेवणात अळ्या निघाल्याने १३ विद्यार्थ्यांची प्रकृतीही बिघडली आहे. यामध्ये पाच मुली आणि आठ मुलांचा समावेश आहे. “गेल्या दोन महिन्यांपासून आम्हाला जेवणाची समस्या येत असून विद्यापीठ प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. आम्ही तक्रार केली तर तुम्ही इथे शिकायला येता की जेवायला?” अशा प्रकारची उत्तरं दिली जात असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे.