नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात अनेक भागांत नळाच्या पाण्यातून अळ्या येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दक्षिण नागपुरातील मानेवाडा रिंग रोडवरील महालक्ष्मी नगरात अनेकांच्या घरी नळाच्या पाण्यातून अळ्या (जळू) येत आहे. याबाबत नागरिकांनी माजी नगरसेवकांकडे तक्रारी केल्या, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असे भागातील नागरिक सुनील आखरे यांनी सांगितले. अशाच प्रकारे संजय गांधी नगर वार्ड क्र. १ मध्ये नळाच्या पाण्यात अळ्या आढळून आल्या. दुषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. याबाबत या भागातील नागरिक अरविंद बापुराव घोरमारे यांनी जलप्रदाय विभागाला निवेदन दिले.
रेशीमबाग गजानन महाराज मंदिर परिसरातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनीही त्यांना गढूळ पाण्याचा पुरवठा केला जातो, अशी तक्रार महापालिकेकडे केली आहे.