अमरावती : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्‍येला अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारे अप्पर वर्धा धरण तिरंगी रोषणाईने उजळून निघाले आहे. धरणाच्या सांडव्यावर लेझरच्या माध्यमातून तिरंगी प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. धरणाच्‍या या तिरंगी जलधारा पाहण्यासाठी बुधवारी सायंकाळी परिसरातील पर्यटकांची गर्दी उसळली.

अप्‍पर वर्धा धरणातील पाणीसाठा १६.९३ टीएमसी म्‍हणजे ८५ टक्‍क्‍यांवर पोहोचला असून धरणातून २६१ क्‍यूमेक विसर्ग सुरू आहे. धरणातील ११ दरवाजांमधून पडणारे पाणी, त्‍याच्‍या तिसंगी छटा आणि अंगावर येणारे तुषार पर्यटकांसाठी पर्वणी ठरली आहे. येत्या काही दिवसांत मध्य प्रदेशात तसेच मोर्शी परिसरातील अप्‍पर वर्धा धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे अप्पर वर्धा धरणातील पाणीसाठा वाढण्‍याची शक्यता आहे. एकूण परिस्थिती पाहता अप्पर वर्धा धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. अप्पर वर्धा धरणाची ११ दारे उघडण्यात आली आहेत.
‘हर घर तिरंगा’ या शासनाच्या उपक्रमांतर्गत अप्‍पर वर्धा धरण व्यवस्थापनाने १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत ही रोषणाई साकारली आहे. या रोषणाईचे व्हीडिओ, छायाचित्रे समाजमाध्‍यमांवर प्रसारीत होताच परिसरातील नागरिकांसह पर्यटकांची गर्दी होत आहे. धरणाच्या समोरील वर्धा नदीवरील पुलावरून ही रोषणाई पाहता येणार आहे.

हेही वाचा – ‘एमपीएससी’ : २५ ऑगस्टच्या संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात महत्त्वाची सूचना

धरणाच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर हे पाणी धरणाच्या भिंतीवरून फेसाळत वर्धा नदीपात्रात जात असते. या फेसाळलेल्या पांढऱ्या शुभ्र पाण्यावर तिरंगी प्रकाशझोत फिरत असल्याने किरणांच्या विविध छटा तयार होत आहेत. रंगसंगतीमुळे हे पाणी जणू राष्ट्रध्वज भासत होते. यामुळे आलेल्या पर्यटकांनी ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत जल्लोष केला. साप्ताहिक सुट्टीसह येणाऱ्या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या संख्येने अप्पर वर्धा धरणाचे मोहक दृश्य पाहण्यासाठी परिसरात गर्दी करतील. तसेच रात्रीच्या सुमारास या ठिकाणी करण्यात आलेली रोषणाई पाहण्यासाठी देखील उशिरापर्यंत या भागात पर्यटकांची गर्दी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – स्वातंत्र्यदिनी आत्मदहन! गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचा इशारा

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील सिंभोरानजीक अप्पर वर्धा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाला १९६५ मध्ये मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली होती. १९९३ मध्ये या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले. या प्रकल्पाच्या कालव्यांची कामे २००३ मध्ये पूर्ण झाली. प्रकल्पाची सिंचन क्षमता ८५ हजार हेक्टर असून आतापर्यंत ८२ हजार हेक्टरची सिंचन क्षमता निर्मिती झाली आहे.