वर्धा : २१ मे हा दिवस राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन म्हणून भारतात पाळल्या जातो. कारण या दिवशी माजी पंतप्रधान यांचे निधन झाले होते. २१ मे १९९१ ला तत्कालीन मद्रासजवळ श्रीपेरंबदूर येथे ‘लिट्टे’ या दहशतवादी संघटनेच्या आत्मघाती हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. हा कालावधी लोकसभा निवडणूकीचा होता. १९८४ ते १९८९ या काळात देशाचे पंतप्रधान राहिलेल्या राजीव गांधी यांनी देशात तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती आणल्याचे म्हटल्या जाते. तसेच संगणक युगाचे प्रवर्तक म्हणून त्यांची ओळख राहली. ते पंतप्रधान असतांना १९८७ ला त्यांनी श्रीलंकेत शांतता प्रस्थापीत करण्यासाठी त्या देशात शांती सेना पाठविली होती. त्याचेच पडसाद उमटून दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली.
या निर्घुण हत्येच्या तीन दिवस आधीच राजीव गांधी हे काँग्रेसचे उमेदवार वसंत साठे यांच्या प्रचारासाठी वर्ध्यात आले होते. रात्री ९ वाजता ते ईथे आल्यानंतर १० वाजता त्यांची सभा रामनगरातील नगर परिषदच्या शाळेच्या स्लॅबवर व्यासपीठ टाकून झाली हाेती. गांधी व साठेसोबतच व्यासपीठावर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव पाटील निलंगेकर, प्रभाराव, प्रमोद शेंडे, डॉ.शरद काळे हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी भाषणातून बाेलतांना राजीव गांधी म्हणाले हाेते की साठे यांना निवडून देणे महत्त्वाचे आहे. तोच एक असा माणूस आहे जो माझे बोट धरून काय चुकले , काय बरोबर हे हक्काने सांगू शकतो. भाषणापूर्वी त्यांना साठे यांनी जेवण करणार काय, अशी विचारणा केली. तेव्हा तात्काळ होकार देत गांधी यांनी सगळे मला भाषणासाठीच बोलवतात, मात्र जेवायचे विचारत नाही. अशी मल्लीनाथी केली होती. तेव्हा प्रमोद शेंडे यांनी लगेच शेखर शेंडे व प्रवीण हिवरे यांना व्यवस्थेसाठी तात्काळ रवाना केले.
हेही वाचा : नक्षलवाद्यांचा गड ‘अबुझमाड’ सुरक्षा यंत्रणांच्या ‘रडार’वर! पाच महिन्यांत १०७ नक्षल्यांचा खात्मा
रात्री एक वाजता (तेव्हा शेषन यांचा आचार संहितेचा बडगा सुरू झाला नव्हता) सभा आटोपल्यानंतर सर्व नेते विश्रामगृहावर पोहचले. राजीव गांधी यांच्यासोबत असलेले विदेशी पत्रकार पण जेवायला सोबत होते, अशी आठवण प्रवीण हिवरे सांगतात. गांधी येणार म्हणून खानसामा घनश्याम यांनी तब्येतीने जेवण तयार केले होते. सावजी पद्धतीचे चिकन तसेच शाकाहारीमध्ये दही भिंडीचा बेत होता. शांतपणे जेवण झाल्यानंतर गांधी व अन्य मंडळी पहाटे दोन वाजता नागपूरला रवाना झाले. आणि त्यानंतर तीनच दिवसांत हत्येची घटना झाली. अवघा देश या हत्येने हळहळला. निवडणूका १५ दिवस पुढे ढकलल्या गेल्या. मात्र तरीही वर्ध्यात साठे यांचा पराभव झाला होता. राजीव गांधी यांचे महाराष्ट्रातील हे शेवटचे भाषण तसेच जेवण पण ठरले.