लोकसत्ता टीम
अकोला : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशीम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. भाजपचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे पूत्र ॲड. ज्ञायक पाटणी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश घेतला. त्यांना राष्ट्रवादीकडून कारंजा मतदारसंघात उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या व कारंजा बाजार समितीच्या सभापती सई प्रकाश डहाके यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय घडामोड अत्यंत वेगाने घडत आहेत. कारंजा मतदारसंघात दोन मोठे पक्षांतर घडून आले. पक्षात प्रवेश करताच उमेदवारी देत राजकीय पक्षांनी आयारामांना संधी दिली आहे. कारंजा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे पूत्र ज्ञायक पाटणी इच्छूक होते. कारंजा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळणार नाही, हे लक्षात येताच भाजपचे ॲड. ज्ञायक पाटणी यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्यांना कारंजामधून उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. २०१९ मध्ये या मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी व वंचित आघाडीत तिरंगी लढत झाली होती. त्यामध्ये दिवंगत राजेंद्र पाटणी यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत राष्ट्रवादीचे प्रकाश डहाके यांचा २२ हजार ८२४ मतांनी पराभव केला होता. आता राष्ट्रवादीकडून ज्ञायक पवार रिंगणात आहेत.
आणखी वाचा-गडचिरोलीत बंडखोरी अटळ; भाजप, काँग्रेसमधील इच्छुकांची अपक्ष लढण्याची तयारी…
दरम्यान. कारंजा बाजार समितीच्या सभापती, राष्ट्रवादीच्या नेत्या सई प्रकाश डहाके यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यांना भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरवले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच त्यांनी पक्ष प्रवेश घेतल्याची चर्चा आहे.
भाजप विरूद्ध राष्ट्रवादी लढत
वाशीम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघात पुन्हा भाजप विरूद्ध राष्ट्रवादी अशी लढत होण्याचा अंदाज आहे. २०१९ मध्ये भाजपचे दिवंगत राजेंद्र पाटणी व राष्ट्रवादीचे दिवंगत प्रकाश डहाके यांच्यात सामना रंगला होता. त्यात भाजपचा विजय झाला होता. आता वंचित आघाडीने कारंजामध्ये बंजारा समाजाचे अभिजीत राठोड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या वेळेस वंचितकडून युसूफ पुंजानी यांनी निवडणूक लढत तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. यावेळेस देखील त्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल.