वर्धा : राज्य शासनाकडून ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावावर कोट्यवधींचा निधी खर्च केला जात असतानाच निवासी डॉक्टरांना मात्र नियमित विद्यावेतन मिळत नसल्याची बाब समोर आली आहे.
वैद्याकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विद्यावेतनाचा तपशील प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने एप्रिल २०२४ रोजी दिले आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करत राज्यातील २० वैद्याकीय महाविद्यालयांनी विद्यावेतनाचा तपशील सादर केलेला नाही. त्यामुळे आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे
वैद्याकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टर तसेच इंटर्न्स काम करीत असतात. त्यांचे विद्यावेतन तसेच कामाचे तास याबाबत शासनाने नियमावली तयार केली आहे. मात्र त्यातील तरतूदींचे पालन केले जात नसल्याच्या तक्रारी होत्या. काही प्रकरणे सर्वोच्च न्यायालयातदेखील पोहोचली. न्यायालयीन निर्देशानुसार राष्ट्रीय वैद्याक आयोगाने (नॅशनल मेडिकल कमिशन) देशभरातील सर्व वैद्याकीय महाविद्यालयांना विद्यावेतनाची माहिती २३ एप्रिल २०२४ पर्यंत सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. काही महिन्यापूर्वी तसे पत्र देण्यात आले. मात्र त्यास उत्तर न मिळाल्याने वैद्याक आयोगाने देशातील १९८ महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावून ‘‘तुमच्यावर दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये’’ अशी विचारणा केली आहे. नोटीस मिळाल्यानंतर पुढील तीन दिवसांमध्ये तपशील सादर करावा, अशा सूचनाही आयोगाने दिल्या आहेत. यात राज्यातील ११ शासकीय व ९ खासगी वैद्याकीय महाविद्यालये आहेत.
हेही वाचा >>>६५ व्या वाढदिवसानिमित्त डॉ संजय ओक रविवारी करणार ६५ बालकांच्या मोफत शस्त्रक्रिया!
नोटीस कुणाला?
शासकीय महाविद्यालयांमध्ये भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्याकीय महाविद्यालय धुळे, राजीव गांधी वैद्याकीय महाविद्यालय ठाणे, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्याकीय महाविद्यालय नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय महाविद्यालय अंबेजोगाई, परभणी, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, अलिबाग व नंदूरबार येथील वैद्याकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. खासगी महाविद्यालयांमध्ये महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च तळेगाव, एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्यूकेशन नागपूर, एससीपीएम धुळे, पद्माश्री डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज नेरूळ, महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज वाशी, परभणी मेडिकल कॉलेज, डॉ.राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती, प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल, सांगली यांचा समावेश आहे.
विद्यावेतनाचे निकष काय?
शासकीय निकषानुसार निवासी डॉक्टरांना मासिक ९० हजार ते १ लाख रुपये विद्यावेतन देणे अनिवार्य आहे. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम व सावंगी येथील वैद्याकीय महाविद्यालयात कार्यरत निवासी डॉक्टरांना ठरलेले मानधन महिन्याच्या चार तारखेला दिले जाते. तसा अहवाल वैद्याक आयोगाला कळविला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.