प्रवाशांना मदत करण्याऐवजी कारकुनी
धावत्या गाडीत प्रवाशांना मदत करण्याच्या आपल्या पहिल्या कर्तव्याला बगल देत वर्षांनुवर्षे नागपूर रेल्वे स्थानकावर कारकुनी कामात व्यस्त असलेल्या तिकीट तपासणीसांना आता विरोध होऊ लागला आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर कार्यरत २९ कर्मचाऱ्यांची यादी तिकीट तपासणीस संघटनेच्या नावाने मुख्यालयातील वित्त व लेखा खात्याकडे पाठवण्यात आली आहे. संघटनेतील साठमारीमुळे हे पत्र लिहिले गेले असले तरी यामुळे कर्मचाऱ्यांच्या गैरव्यवस्थापनावर नेमके बोट ठेवले गेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्मचाऱ्यांचे गैरव्यवस्थापनावर भाषणातून नापसंती व्यक्त केली होती. त्याचा आधार घेत तिकीट तपासणीस म्हणून रेल्वे नियुक्त झालेले अनेक कर्मचारी १५ ते १८ वर्षांपासून एका ठिकाणी काम करीत आहेत. एक तिकीट तपासणीस म्हणून त्यांनी कधी रेल्वेगाडीत काम केलेले नाही किंवा विनातिकीट प्रवाशांना पकडून रेल्वेच्या महसूलात भर टाकली आहे.
यादीतील २९ तिकीट तपासणीसांपैकी बहुतांश कारकुनी काम करीत आहेत. यातील काही आजारी आणि अपंग असल्याने धावत्या गाडीत काम करू शकत नाही हे खरे आहे. पण यात अनेक महिला तिकीट तपासणीस आहेत. ज्यांच्याकडे कारकूनी काम आहे त्यांनी कधीच दिवसाला आठ तास काम केले नाही. तिकीट तपासणीसांचे पद हे संवेदनशील आहे. परंतु अनेक कर्मचाऱ्यांनी कित्येक वर्षांपासून तिकीट तपासणींचे काम केलेले नाही. रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार कर्मचारी बदली आणि चक्रानुक्रमाने (रोटेशन) कामाच्या स्वरूपात बदल अपेक्षित आहे. मात्र येथे रेल्वे बोर्डाचे निर्देश पाळण्यात येत नाही. यामुळे तिकीट तपासणीस कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, असे म्हटले आहे.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कर्मचारी व्यवस्थापनाचा दाखला देखील देण्यात आला आहे. या विभागातील महिला तिकीट तपासणीस देखील धावत्या गाडीत काम करतात. नियमितपणे बदल्या आणि कामाच्या स्वरुपात देखील बदल केले जाते. मात्र मध्य रेल्वेच्या नागपूर स्थानकावर अनागोंदी आहे. यामुळे गाडीत प्रवाशांना सुविधा मिळत नाही. शिवाय या कर्मचाऱ्यांवरील रेल्वेचा वेतनाचा भार पडतो आहे, असा दावा त्यात करण्यात आला आहे. यासंदर्भात बोलताना रेल्वे तिकीट तपासणीस संघटनेचे अध्यक्ष एस.आर. कालरा म्हणाले, मी स्वत: सहाशे कर्मचाऱ्यांना हातळत असतो. शिवाय माझ्या विभागाविषयी माझी कशी तक्रार करणार. काही असंतुष्ट कर्मचाऱ्यांनी हा खोडसाळपणा केला असावा.
आमच्या संघटनेची ही भूमिका नाही. याआधी यासंदर्भातील माहिती प्रसिद्धी माध्यमापर्यंत पोहचवण्यात आली होती. त्यांच्यापैकी कुणीतरी ही माहिती बाहेर काढली असावी. रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणीस गप्पा मारताना बसून राहावे, यास आमच्या संघटनेचा विरोधच आहे, असेही संघटनेचे कार्याध्यक्ष आर.एस. पांडे म्हणाले. संघटनेचे सचिव एस.के. मोगरे यांनी देखील या पत्राबद्दल अनभिज्ञता व्यक्त केली आहे. याबाबत मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक के.के. मिश्रा यांनी लघुसंदेशाला तसेच भ्रमध्वनीला प्रतिसाद दिला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा