नागपूर: कधी काळी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा मुद्या हा राजकारणाचा प्रमुख मुद्दा असायचा. सर्वपक्षीय नेत्यांची या मुद्यावर अनेकदा ऐकजूटही व्हायची, याच मुद्द्यावर काही लोक आमदार, खासदार आणि मंत्री झाले. सत्तेत गेल्यावर मुद्दा विसरले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने सत्तेत आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ असे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यावर याचा या पक्षाला विसर पडला. पण काही कट्टर विदर्भवादी अजूनही वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी संघर्ष करीतच आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जय विदर्भ पार्टीच्यावतीने शोभा बाबाराव मस्की यांनी १५ ऑगस्ट २०२४ पासून स्वतःला लोखंडी पिंजऱ्यात बंदिस्त करून “आमरण उपोषण” सुरू केले होते. उपोषणाला ७ दिवस होऊनही शासन-प्रशासनाचा एकही व्यक्ती त्यांची भेट द्यायला आला नाही. साधी विचारपूस केली नाही. ऐवढेच नव्हे तर एकही लोकप्रतिनिधी त्याच्या उपोषणस्थळी आला नाही.
शोभा मस्की यांना रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांना रोज जेवणानंतर गोळ्या घ्याव्या लागतात. परंतु त्यांनी अन्नत्याग केल्याने ७ दिवसांपासून गोळ्या घेणे बंद आहे. त्यामुळे त्यांचा रक्तदाब वाढला. त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे त्यांना मेयो रुग्णालयात पोलिसांनी भरती केल आहे. विदर्भ राज्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी उपोषण करणार, माझा जीव गेला तरी चालेल परंतु विदर्भाच्या जनतेला महाराष्ट्राच्या गुलामगिरीतून मुक्त करणार या मागणीवर शोभा मस्की अजूनही ठाम आहे. ” मला मुले- बाळे नाहीत, विदर्भाची अडीच कोटी जनता हीच माझी मुले बाळे आहेत. माझा शेतकरी भाऊ आत्महत्या करीत आहे. रोजगार नसल्याने युवक पलायन करीत आहे. महिला सुरक्षित नाही हे सर्व चित्र मला बघवलं जात नाही म्हणून, मी उपोषण करीत आहे. एक दिवस विदर्भाचे स्वतंत्र राज्य होणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
११ ऑगस्टपासून १४ ऑगस्टपर्यंत बाबाराव व शोभा मस्की दामपत्याने साखळी उपोषण केले. एकही शासन – प्रशासनाचा माणूस ढुंकूनसुद्धा पहायला तयार नाही म्हणून नाईलाजास्तव शोभा मस्की यांनी आमरण उपोषणला सुरुवात केली तेव्हा कुठे पोलीस उपायुक्त यांनी उपोषणकर्त्यांचे ऐकून घेतले, मस्की दाम्पत्याने पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले की स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ही केंद्राची आहे म्हणून केंद्र सरकारचे मंत्री नितीन गडकरी यांनी उपोषणाला भेट देऊन आमचे म्हणणे ऐकावे. परंतु पोलीस अधिकारी उपोषणकर्त्यांना सांगत आहे, की ते उपोषण मंडपाला भेट देणार नाही, तुमची गरज असेल तर गडकरी यांच्या घरी आम्ही तुम्हाला घेऊन जातो. ज्यांनी २०१४ ला स्वतंत्र विदर्भ राज्याचे लिखित आश्वासन दिले त्यांना आज उपोषणकर्त्यांना भेटण्याकरितासुद्धा वेळ नाही ही शोकांतिकाच. विदर्भाच्या जनतेने अश्या लोकप्रतिनिधीकडून काय अपेक्षा करावी, असा सवाल विदर्भवाद्यांनी केला आहे.
हेही वाचा – Raj Thackeray : “गत पाच वर्षांत या लोकांनी महाराष्ट्र नासवला,” राज ठाकरे असे का म्हणाले?
यापूर्वी २७ डिसेंबर २०२३ ते १ जानेवारी २०२४ पर्यंत विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे १७ कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसले होते. तेव्हाही एकाही लोकप्रतिनिधीने भेट दिली नाही. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी संविधान चौकात दीढ तास रस्ता रोको आंदोलन केले होते. अशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्तीची सरकार वाट बघत आहे का ? आम्ही महाराष्ट्र व केंद्र सरकारचा निषेध करतो. आमचा अंत पाहू नये, उपोषणकर्त्यांनी स्वतःला बेड्यामध्ये बंदिस्त करून स्वतःचा जीव विदर्भ राज्यासाठी धोक्यात घातला आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु सरकार ऐकायला तयार नसेल तर आम्ही टोकाचे पाऊल उचलायला तयार आहोत, असा इशारा विदर्भ पार्टी उपाध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी दिला आहे.