नागपूर : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे बळी घेतले आहेत. आता पुन्हा गांधी संपवण्याची जाहीर धमकी दिली जात आहे. भाजपचे सरकार मात्र त्यावर काहीही कारवाई करत नाही , हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. या विरोधात शुक्रवारी नागपूर शहर काँग्रेसने व्हरायटी चौकात आंदोलन केले व भाजपचा धिक्कार केला.या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार ॲड. अभिजीत वंजारी, महिला काँग्रेस शहाराध्यक्ष ॲड. नंदा पराते, रमन पैगवार, विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, बंडोपंत टेंभूर्णीकर, प्रशांत धवड, प्रज्ञा बडवाईक, संजय महाकाळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलनात कॉंग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांना धमकी देणारा भाजपचा माजी आमदार तरविंदर सिंह मारवाच्या अटकेची मागणी केली. मारवा यांचे वक्तव्य हा भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आहे. भाजपाला गांधी नावाची ऍलर्जी आहे म्हणूनच मोदींपासून सर्वच नेते राहुल गांधी यांची सातत्याने बदनामी करत असतात. आतातर भाजपाने सर्व मर्यादाच सोडल्या आहेत. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा जाणिवपूर्वक चुकीचा अर्थ काढून माथी भडवण्याचा प्रकार भाजप करीत आहे.
हे ही वाचा…नागपूर: एसटीने निघाले अन् पुरात अडकले
तसेच राहुल गांधी यांच्या या एका विधानावरून त्यांना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सारखेच मारु, अशी धमकी दिली जात आहे. हे अतिशय निंदनीय आहे. गांधी कुटुंबाने देशासाठी बलिदान दिले आहेत. महात्मा गांधी, इंदिरा गांधी व राजीव गांधी देशासाठी शहीद झाले. गांधी कुटुंबाच्या जीवाला आजही धोका आहे तरीही राहुल गांधी जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य जनतेत मिसळतात. तरविंदरसिंह मारवा हे भाजपच्या द्वेषपूर्ण आणि हिंसक राजकारणाच्या कारखान्यात तयार झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी यावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हे ही वाचा…‘समृद्धी’वरील उत्तररात्रीचा थरार…काय घडले?
राहुल गांधी यांच्या आरक्षणाच्या वक्तव्यावरून भाजपने नुकतेच नागपुरात आंदोलन केले होते. त्यानंतर शुक्रवारी काँग्रेसने राहुल गांधी यांना जीवे मारण्याच्या धमकी दिल्याच्या कारणावरून भाजप विरोधात आंदोल केले. त्या आधीही काँग्रेसने शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याचा मुद्यावरून महायुती सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन केले होते.आजच्या आंदोलनात काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
© The Indian Express (P) Ltd