चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर मला चांगले खाते द्या अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याकडे करून मी काँग्रेस उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांचा प्रचार करणार, मात्र मला भविष्यात मी मागेल ते हवे आहे, असा संदेश दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडिया आघाडी व महविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेत वडेट्टीवार यांनी आपल्या जोषपूर्ण भाषणाने जोश भरला. मात्र हे करताना त्यांनी पक्षाने मला सर्वकाही दिले असेल तरी आणखी मला बरेच काही हवे आहे हा संदेश दिला. वडेट्टीवार व धानोरकर यांच्यात लोकसभा उमेदवारी वरून वाद झाला. पक्ष श्रेष्ठींनी मध्यस्थी करून दोघांमधील भांडण लोकसभा निवडणुकीपूर्ते शांत केले आहे. मात्र निवडणूक निकाल कोणताही आला तरी हा राजकीय वर्चस्वाचा वाद पुन्हा डोकं वर काढणार आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांनी धानोरकर यांच्या प्रचारासाठी मंचावर येताना विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राज्यात सत्ता आली तर चांगल्या खात्याची मागणीच पुढे केली आहे.

हेही वाचा – केजरीवालांच्या अटकेचा धक्का कोणाला आणि का?

कारण धानोरकर निवडणूक जिंकल्या तर वडेट्टीवार यांना राज्यात मंत्रिपद मिळू देणार नाही आणि पराभव झालाच तर सर्व खापर वडेट्टीवार व समर्थकांच्या डोक्यावर फोडून मंत्रिपद मिळू देणार नाही. या सर्व राजकारणाची कल्पना वडेट्टीवार यांना आहे. त्यामुळेच वडेट्टीवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच चांगले खाते द्या असा आग्रह पक्षाकडे केला असावा अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

हेही वाचा – विश्लेषण : जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणांना दिलासा कसा मिळाला? सर्वोच्च न्यायालयाने काय कारण दिले?

दुसरीकडे चांगले खाते मिळाले नाही तर माझ्याकडे अन्य पर्याय देखील उपलब्ध आहेत, असाही संदेश वडेट्टीवार यांनी दिला आहे. विशेष म्हणजे वडेट्टीवार यांनी जाहीर भाषणातून या मागण्या समोर करताच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चांगले खाते देऊ असा शब्द वडेट्टीवार यांना दिला. तसेच काँग्रेस प्रभारी चेन्नीथला यांनीही मतभेद विसरून वडेट्टीवार प्रचाराला आले यासाठी जाहीर आभार मानले. मात्र या लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व कोण करणार हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्यातरी अशी अनेक आश्वासने तथा मागण्या काँग्रेस पक्षाकडून समोर येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leader of opposition vijay wadettiwar demanded good ministry post even before the elections know the reason rsj 74 ssb