“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार होते, परंतु त्यांना ज्यांना भेटायचे होते त्यांनी वेळ दिली नसावी. कारण, दिल्लीतील श्रेष्ठींना संपूर्ण देशाचा कारभार पाहायचा असतो.”, अशी टिप्पणी करून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपा श्रेष्ठींकडे शिंदेंसाठी वेळ नाही, याकडे लक्ष वेधले.
अजित पवार विदर्भातील पूर परिस्थिती पाहण्यासाठी दौऱ्यावर आहेत. काल (बुधवार) रात्री ते नागपुरात पोहोचले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी अजित पवारांनी, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन २७ दिवस झाले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, ते म्हणतात आम्ही दोघे काम करीत आहोत. मात्र हे शक्य नाही. प्रत्येक फाईल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे जाणार असेल तर ते शक्य नाही. त्यांना एवढे मोठे बहुमत मिळाले आहे, त्यांनी ते विधानसभेत दाखविले देखील आहे. मग मंत्रिमडळ विस्तार का करत नाही.”, असा सवालही केला.
तसेच, “राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी आधीच केली आहे. पहिली पेरणी वाया गेली आहे. दुबार पेरणीचे संकट आहे. शेतातील रोपे गळून गेली आहे. रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. पूल वाहून गेले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आले होते. मात्र, पण ते गडचिरोलीत आतील भागात जाऊ शकले नाही. एवढ्या दिवसात जशी मदत मिळणे अपेक्षित होते, तशी अद्याप मिळालेली नाही.” असं अजित पवार म्हणाले.
याचबरोबर, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एसडीआरएफचे निकष बाजूला ठेऊन आम्ही मदत करीत होतो. गेल्या काही दिवसात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. खासकरून मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत.” याकडेही अजित पवारांनी लक्ष वेधले.