यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार संपण्यास अवघे चार दिवस शिल्लक आहेत. शेवटच्या टप्प्यात आलेला प्रचार टिपेला पोहोचला असून, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आता मतदारांच्या प्रत्यक्ष भेटींवर भर दिला आहे. महायुतीच्या उमदेवार राजश्री पाटील यांच्यासाठी विविध बड्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू असताना, महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे मोठ्या सभांच्या बाबतीत मागे पडल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात येत्या २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. २४ ला सायंकाळी जाहीर प्रचार थांबणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस उमेदवारांसाठी ‘करो या मरो’ या पद्धतीचे राहणार आहेत. वैयक्तिक बैठका, रॅली, जाहीर सभा, कॉर्नर बैठका यावर दोन्ही उमदेवारांनी भर दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी उमेदवार राजश्री पाटील यांना निवडून आणण्यासाठी पराकाष्ठा चालविली आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आतापर्यंत तीनवेळा यवतमाळ-वाशिम मतदारसंघात राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी येवून गेले आहेत. येत्या २४ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा यवतमाळ येथे रॅलीसाठी येणार आहेत. ते यवतमाळात बाईक रॅलीत सहभागी होणार आहेत.

हेही वाचा – प्रचाराचे तंत्र नवे, मुद्दे मात्र जुनेच; अकोला मतदारसंघात प्रचार मोहिमेला वेग

आज रविवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राळेगाव येथे जाहीर सभा होत आहे. राळेगाव हा आदिवासी राखीव मतदारसंघ आहे. येथे भाजपचे आ. प्रा. डॉ. अशोक उईके हे आमदार असून उपमुख्यमंत्री फडणवीस यांची आजची सभा राजश्री पाटील यांच्यासह आमदार उईके यांच्यासाठीही महत्वाची ठरणार आहे. राजश्री पाटील या वक्त्या म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र यवतमाळात त्यांची अद्यापही मोठी सभा झाली नाही. त्यामुळे येत्या २३ एप्रिल रोजी येथील पोस्टल मैदानावर त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीचे उमदेवार संजय देशमुख यांच्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व रोहित पवार वगळता अन्य कोण्याही बड्या नेत्याची सभा जिल्ह्यात झाली नाही. काँग्रेसचे स्थानिक नेते माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके आदी त्यांच्यासाठी सभा, बैठका घेत आहेत. मात्र वलयांकित नेत्याची अद्याप एकही सभा न झाल्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे. उरलेल्या तीन, चार दिवसांत उमेदवारांना आपले नाव व चिन्ह मतदारांच्या मन आणि मेंदूपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रचंड खटाटोप करावा लागणार आहे.

हेही वाचा – ‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…

निर्सगाच्या लहरीपणा तापदायक

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात एकीकडे उमदेवारांचा प्रचार शिगेला पोहोचला असताना, निसर्गाच्या लहरीपणाचा फटकाही प्रचारास बसत आहे. शनिवारी मुख्यमंत्र्यांची सभा मंगरूळपीर येथे सुरू असताना अचानक वादळी पाऊस आल्याने तारांबळ उडाली. दिवसभर प्रचंड ऊन तापत असल्याने प्रचारावर मर्यादा येत आहे. सायंकाळी अवकाळी, वादळी पावसाची स्थिती निर्माण होत असल्याने या वेळातही प्रचारात खोळंबा निर्माण होत आहे. त्यामुळे पहाटेपासूनच उमेदवार घराबाहेर पडून मतदारांच्या भेटींवर भर देत असल्याचे चित्र आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leaders in mahayuti in campaign meanwhile mahavikas aghadi is waiting for a big meeting eknath shinde will visit yavatmal for the fourth time nrp 78 ssb