नागपूर : नागपुरात सत्तारुढ पक्षाच्या नेत्यांची पोलिसांवर दादागिरी सुरू असून ते गुंडांना पाठीशी घालण्यासाठी थेट पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकत आहेत. पक्षात मोठे वजन असलेल्या नेत्यांनी गुंडांसाठी पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना दमदाटी केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बजाजनगरातील एका नामांकित हॉटेलमध्ये कुख्यात गुंड आणि मकोकाचा आरोपी सुमित चिंतलवार आणि त्याच्या १० ते १५ साथिदारांनी धुडगूस घातला होता. व्यवस्थापकाला पिस्तूल दाखवून धमकी दिली होती. या प्रकरणी उशिरा का होईना बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र, लगेच दुसऱ्या दिवशी सत्तारुढ पक्षाच्या एका नेत्याने बजाजनगर पोलीस ठाणे गाठले. पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकून चिंतलवार याला सोडविण्यासाठी प्रयत्न केला. तसेच पोलिसांवर प्रकरण दाबण्यासाठी दमदाटी केल्याची चर्चा आहे.

हेही वाचा – राजशिष्टाचाराचे कारण देत उपराष्ट्रपतींकडून राष्ट्रसंतांची उपेक्षा! शताब्दी महोत्सवातील प्रकार

दुसऱ्या प्रकरणात अंबाझरी पोलिसांनी आशू अवस्थी, विकी पांडे आणि जमील सय्यद यांना १ ऑगस्टला शंकर नगर येथे एका युवकाला मारहाण केल्याप्रकरणी अटक केली होती. मात्र, सत्तारुढ पक्षाच्या नामांकित नेत्याने अंबाझरी पोलिसांशी संपर्क साधला. अटकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलिसांवर दबाव आणून प्रकरण मिटविण्यास सांगितल्याची चर्चा आहे.

हेही वाचा – अमरावती : खबरदार! खुल्‍या भूखंडावर अस्‍वच्‍छता आढळल्‍यास फौजदारी कारवाई

अवस्थीवर १९ तर पांडेवर विविध पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आता सत्तारुढ पक्षाचे नेते गुंडांची बाजू घेऊन त्यांना पाठिशी घालत आहेत. त्यामुळे पोलिसांसमोरही कारवाई करताना संभ्रम निर्माण झाला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leaders of the ruling party in nagpur pressure on the police adk 83 ssb
Show comments