वर्धा : आता १५ ऑगस्ट हा राष्ट्रीय सण देशभरात साजरा होणार. तशी तयारी शाळा, प्रशासन व राजकीय पातळीवर सुरू झाल्याची धुमधाम दिसते. या दिवसाचे महत्व सांगायला नको. झेंडावंदन करतांना काय काळजी घ्यावी याचे स्पष्ट निर्देश आहेत. अवैधानिक सूचना, प्रथा, परंपरा या खेरीज बोधचिन्हे व नावे अधिनियम १९५० तसेच राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१ अंतर्गत राष्ट्रध्वज लावण्याचे नियमन केल्या जात होते. पुढे २६ जानेवारी २००२ पासून याबाबत मार्गदर्शन करणारी भारतीय ध्वज संहिता अस्तित्वात आली. त्यात नेत्यांसाठी दिलेला सल्ला नमूद आहे.
डॉ. एस. राधाकृष्णन यांनी संविधान सभेत राष्ट्रध्वजातील रंगांच्या व चक्रच्या अर्थसूचकतेबद्दल सविस्तर वर्णन केले. ते म्हणाले होते की ‘भगवा किंवा केशरी रंग हा स्वार्थनिरपेक्ष त्यागाचा प्रतीक आहे. आपल्या नेत्यांनीसुद्धा भौतिक लाभांपासून तटस्थ राहले पाहिजे आणि आपल्या कामात स्वतःला वाहून घेतले पाहिजे. मध्यभागी असलेला पांढरा रंग हा प्रकाशाचा, आपल्या आचरणात मार्गदर्शन करणाऱ्या सत्याचा मार्ग आहे. हिरवा रंग हा आपले मातीशी असलेले नाते व ज्यावर इतर सर्वांचे जीवन अवलंबून आहे अश्या वनस्पती जीवनाशी असलेले आपले नाते दर्शवितो. पांढऱ्या रंगाच्या मध्यभागी असलेले अशोक चक्र हे धर्म नियमांचे चक्र आहे. जे या ध्वजाखाली काम करतात त्यांची सत्य, धर्म, सदाचार ही नियंत्रक तत्वे असली पाहिजे. तसेच चक्र हे गतीचे दर्शक आहे. तेथे कुंठीततेत मृत्यू आहे. गतिमानतेत जीवन आहे. भारताने परिवर्तनास कसलाही प्रतिरोध करू नये. त्याने गतिमान बनले पाहिजे व पुढे गेले पाहिजे. चक्र हे शांततापूर्ण परिवर्तनाच्या गतीशीलतेचे निदर्शक आहे.’ असा संदेश डॉ. राधाकृष्णन यांनी देऊन ठेवला आहे. तो केवळ नेत्यांनाच नव्हे तर प्रत्येक भारतीयांस लागू असल्याचे स्पष्ट आहे.
आणखी वाचा-नागपुरात चिकनगुनियाचे थैमान, शासकीय डॉक्टर संपावर…
सर्वांच्या सोयीसाठी ध्वज संहितेची तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. भाग एकमध्ये राष्ट्रध्वजाच्या सर्वसाधारण वर्णनाचा समावेश आहे. भाग दोनमध्ये जनतेतील कोणतीही व्यक्ती, खाजगी संघटना, शैक्षणिक संस्था आदिना राष्ट्रध्वज लावण्याबाबत माहिती दिली आहे. संहितेचा भाग तीन हा केंद्र सरकार व राज्य सरकारे आणि त्यांच्या संघटना व अभिकरणे यांनी राष्ट्रध्वज लावण्यासंबंधातील आहे.भारताचा राष्ट्रध्वज हा भारतीय लोकांच्या आशा व आकांक्षाचा प्रतिनिधित्व करतो. भारतीय राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्राबद्दलच्या अभिमानाचे प्रतीक होय, असे ध्वज संहिता नमूद करते.