राज्यभरात शिकाऊ वाहन परवान्यांचे संकेतस्थळ ठप्प, रोज लाखोंना फटका

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूरसह राज्यभरातील नागरिकांना शिकाऊ वाहन परवाना काढण्याकरिता ऑनलाइन अपॉईंटमेंटची सक्ती आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून या संकेतस्थळात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने नागपूरसह राज्यभरातील या अपॉईंटमेंटचे काम पूर्णपणे बंदच आहे. बहुतांश नागरिक वारंवार अपॉईंटमेंट घेण्याकरिता इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन संकेतस्थळावर माहिती अपलोड करूनही काम होत नसल्याने त्यांचा वेळ व पैसाही वाया जात आहे.

केंद्र व राज्य शासनाकडून नागरिकांकरिता आधुनिक तंत्रज्ञानावर भर दिला जात आहे. राज्याच्या परिवहन विभागाने राज्यभरातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) नागरिकांच्या सुविधेसाठी शिकावू परवान्यासाठी ऑनलाइन अपॉईंटमेंटची योजना सुरू केली. त्याकरिता नागपूरच्या शहर आरटीओत रोज सुमारे दीडशे, पूर्व नागपूरच्या उपप्रादेशिक कार्यालयात २६५ आणि नागपूर ग्रामीणसह राज्यभरातील आरटीओच्या कार्यालयांसाठीही रोज अपॉईंटमेंट व उमेदवारांना द्यायच्या परवान्याचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. या योजनेनुसार राज्यभरातील इच्छुकांनी परवान्यासाठी ‘सारथी.एनआयसी.इन’ या संकेतस्थळावर स्वतची माहिती अपलोड करून विशिष्ट दिवस निश्चित करावा लागत आहे.

अपॉईंटमेंटच्या दिवशी उमेदवाराला परिवहन कार्यालयात आपली कागदपत्रे व अर्ज सादर करून नियमानुसार शिकाऊ वाहन परवान्याची कार्यवाही पूर्ण करावी लागते. यावेळी उमेदवाराची ऑनलाईन परीक्षेसह इतर चाचण्या घेतल्या जातात. मात्र, शासनाने ही आधुनिक पद्धत आणल्याने नागरिकांना तातडीने व वेळेवर शिकाऊ वाहन परवाना मिळणे अपेक्षित होते, परंतु नागपूरसह राज्यभरातील आरटीओ कार्यालयांमध्ये सध्या ऑनलाइन अपॉईंटमेंटकरिता बऱ्याच महिन्यांची प्रतीक्षा यादी आहे. त्यातच गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात या संकेतस्थळात बिघाड निर्माण झाल्याने हे कामच बंद पडल्याचे उमेदवार सांगत आहे. त्यामुळे लाखो उमेदवार इंटरनेट कॅफेमध्ये रोज गेल्यावरही त्यांचे काम होत नाही, त्यामुळे वेळेसह इंटरनेटवर रोज कोटय़वधी रुपये वाया जात आहे. त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्थानिक ‘आरटीओ’च्या अधिकाऱ्यांना नागरिकांचा त्रास दिसत असतांनाही त्यांना काहीच करता येत नाही. अधिकाऱ्यांना अशा स्थितीत नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून काही अधिकार मिळणार काय? हाही प्रश्न निर्माण झाला आहे.

सव्‍‌र्हर दुरुस्तीचे काम सुरू

राज्यभरात ‘ऑनलाइन अपॉईंटमेंट’चे काम ‘सारथी’ नावाच्या संकेतस्थळावरून केले जाते. यावर पुण्याच्या राष्ट्रीय माहिती सूचना केंद्राचे नियंत्रण होते. परिवहन अधिकाऱ्यांना वेबसाईट बंदबाबत विचारल्यावर त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर या संकेतस्थळावर काही बदल केले जात असल्याची माहिती दिली. त्यामुळे राज्यात बऱ्याच भागात हे काम बंद वा तांत्रिक कारणाने संथगतीने होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर नागपूर शहराचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दुर्गप्पा पवार व परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर तो होऊ शकला नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Learner driving license website jam