नागपूर : शहरातील झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे पट्टेपाटप येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. त्याबाबतचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. फडणवीस यांच्या हस्ते देवगिरी शासकीय निवासस्थानी अनधिकृत भूखंडाचे नियमितीकरण पत्र व झोपडपट्टीवासीयांना पट्टे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
आज १८ भूखंडांचे नियमितीकरणपत्र व ११ झोपडपट्टीधारकांना प्रातिनिधिक स्वरूपात पट्टेवाटप करण्यात आले. यावेळी नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी उपस्थित होते. शहरातील शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी मालकीच्या जागेवरील झोपडपट्टीतील अतिक्रमण धारकांचे क्षेत्र नियमानुकुल करून त्यांना स्थायी पट्टे वाटप करण्यासाठी महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास तसेच महसूल विभागातर्फे संयुक्त मोहीम राबवून पट्टे वाटपाच्या कामाला प्राधान्य देण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या.
हेही वाचा >>> अमरावती : नवभारत साक्षरता कार्यक्रमावर शिक्षकांचा बहिष्कार कायमच
महापालिका क्षेत्रात ४२६ झोपडपट्ट्या असून त्यापैकी २९८ घोषित तर १२८ अघोषित आहेत. सुधार प्रन्यासतर्फे ३६० झोपडपट्टीवासीयांना घरकूल पट्टे वाटपाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात आले आहे. मिश्र जागेवर असलेल्या २०० झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण शासनाच्या भूमापन विभागाने करून तत्काळ संबंधित विभागांना अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.