बुलढाणा : एप्रिल महिन्यात विदर्भात वैचारिक वादळ उठण्याची चिन्हे आहेत. अंनिसचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांची विदर्भात एप्रिल महिन्यात जाहीर व्याख्यान मालिका आयोजित करण्यात आली आहे. ५ ते २९ एप्रिलदरम्यान आयोजित व्याख्यानात मानव ‘दिव्य शक्ती’ची पोलखोल करणार आहे.
विदर्भातील ११ जिल्ह्यांत त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानाचा ‘खरे संत कोण? संत ज्ञानेश्वर की भागेश्वर? संत तुकाराम की आसाराम?’ हा विषय असून त्यामुळेच वैचारिक आणि कदाचित सामाजिक-राजकीय वादळ उठण्याची शक्यता आहे. धिरेंद्र महाराजांच्या दिव्य दरबारात किती तथ्य, ते अंनिसचे आव्हान स्वीकारण्यास का तयार होत नाही, पोलिसांनी कारवाई का केली नाही, आदी वादग्रस्त मुद्यांवर प्रा. मानव पोलखोल करणार आहे.
हेही वाचा – महिलाराज! चंद्रपूर जिल्ह्यात महिलांनी सांभाळली पोलीस ठाण्याची जबाबदारी
प्रा. मानव व बागेश्वर महाराज यांच्यात संघर्ष घडलेल्या व महाराजांना पोलिसांची ‘क्लीन चिट’ मिळालेल्या नागपुरात १९ एप्रिलला व्याख्यान पार पडणार आहे. बुलढाण्यात २७ ला व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. बुलढाण्यात पूर्वतयारी बैठक पार पडल्याची माहिती अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा जिल्हा संघटक दत्तात्रय शिरसाट यांनी दिली.
यवतमाळ येथून प्रारंभ
५ एप्रिलला यवतमाळ येथून या व्याख्यान मालिकेचा प्रारंभ होणार असून ७ ला वर्धा, ९ चंद्रपूर, १२ गडचिरोली, १५ गोंदिया, १७ भंडारा, १९ नागपूर, २३ अमरावती, २५ वाशीम, २७ एप्रिलला बुलढाणा येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अकोला येथे २९ ला मालिकेचा समारोप होणार आहे.