मातृत्वाची अनुभूती एकदा, दोनदा नव्हे तर तीनदा ‘ली’ला आली, पण तिन्ही वेळा तिला तो आनंद घेता आला नाही. मातृत्वाचा सोहोळा रंगण्याआधीच प्रत्येकवेळी ‘ली’च्या आनंदावर विरजण पडले. आता पुन्हा एकदा ती गर्भवती असून यावेळी ‘ली’ला मातृत्वाचे सुख मिळणार का, यावर प्रश्नचिन्ह आहे.
२००९ साली वाघिणीपासून दुरावलेले तीन बछडे महाराजबाग प्राणिसंग्रहालयात आणले होते. ली, जान आणि चेरी अशी त्यांची नावे ठेवण्यात आली. महाराजबाग प्राणिसंग्रहालयात ‘साहेबराव’ या वाघापासून ती पहिल्यांदा गर्भवती राहिली होती. त्यानंतर ‘ली’ आणि ‘साहेबराव’ या दोघांचीही रवानगी गोरेवाड्यात झाली. २०१८ साली पुन्हा एकदा या दोघांचे मिलन झाले. तीन फेब्रुवारी २०१८ ला तिने चार बछड्यांना जन्म दिला, पण अनुभव नसल्याने चारही बछडे तिने गमावले. त्यानंतर ३१ मे २०२२ ला तिने बछड्याला जन्म दिला. त्याला चाटल्यानंतर तिने बछड्याची शेपूट पकडून त्याला गवतात झाकले. थोड्यावेळाने त्याला पुन्हा उचलले आणि त्याचवेळी त्याच्या डोक्याला मार लागला व तो मृत पावला.
वास्तविक गोरेवाड्यातील ‘ली’च्या पहिल्या गर्भधारणेच्या वेळेचा अनुभव पाहता दुसऱ्यावेळी व्यवस्थापनाने काळजी घ्यायला हवी होती. पुरेशी काळजी न घेतल्यामुळे तिने बछडा गमावला. प्राणिसंग्रहालयाच्या अभिरक्षकाची ही जबाबदारी असताना तिच्या प्रसूतीकाळात ते अनुपस्थित होते. त्यामुळे आता गोरेवाडा व्यवस्थापनाने तिच्या मातृत्वाची विशेषत्वाने काळजी घ्यायला हवी. तिच्यासाठी अनुभवी पशुवैद्यकांचे विशेष पथक, प्रसूतीसाठी विशेष नवा पिंजरा आणि पुरेशी वातावरण निर्मिती आवश्यक आहे.
मात्र, जुन्या पिंजऱ्यालाच नवे रूप देण्यात येत आहे. ‘ली’ची सोनोग्राफी होऊन जवळजवळ एक महिना झाला, पण अजूनही पिंजरा तयार नाही. दरम्यान, याबाबत गोरेवाड्याचे विभागीय व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून भ्रमणध्वनीला प्रतिसाद मिळाला नाही.