वाशिम : हल्ली दीर्घायुष्य लाभणे कठीण झाले आहे. सर्वसाधारणपणे ७० ते ८० वर्षे हे मानवाचे सरासरी आयुष्य समजले जात आहे. मात्र, वाशिम जिल्ह्यातील आमखेडा येथील सुंदरबाई नामदेव ताजने यांनी याला फाटा दिला. आज, १४ डिसेंबर रोजी त्यांनी १२५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून त्याच्या दीर्घ आयुष्याबद्दल सर्वत्र चर्चा रंगली आहे.
आजच्या काळात शंभरी पार करणारे क्वचितच पाहायला मिळतात; पण जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे शंभरी पार करणाऱ्यांची संख्या तुलनेत जास्त आहे. आजच्या धावपळीच्या काळात अनेकजन दीर्घ आयुष्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र तरीही माणसाचे आयुष्यमान कमालीचे खालावत चालले आहे. मालेगाव तालुक्यातील आमखेडा येथील सुंदरबाई नामदेव ताजने यांचे आज १२५ व्या वर्षी निधन झाले. वयाची शंभरी पूर्ण केल्याबद्दल सुंदरबाईंचा प्रशासनाने सत्कार केला होता. सुंदरबाई या गरीब कुटुंबातील असून मोलमजुरी करून जगल्या.