नागपूर: राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला कधी काळी ‘हुरडा पार्टी’ अधिवेशन संबोधले जायचे. सभागृहात परस्परांवर तुटून पडणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते सभागृहाबाहेर पडल्यावर मात्र ऐकमेकांचे मित्र असल्यागत वागत. कालांतराने यात बदल झाला. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यावर सदस्यांमधली कटुता वाढली. मात्र अजूनही काही जण याला अपवाद आहेत. यात काही ज्येष्ठ आहेत तर काही तरुण सदस्यही आहेत. अशाच एका कॉंग्रेसच्या जुन्या ज्येष्ठ नेत्याची आणि कॉंग्रेसपासून दुरावलेल्या तरूण नेत्यांची भेट हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवन परिसरात झाली. ते होते कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशोक चव्हाण यांनी  सत्यजीत तांबे भेट झाल्यावर चव्हाण म्हणाले, “काय सत्यजित आवाज देत नाहीस” . त्यावर सत्यजित तांबें यांनी प्रतिउत्तरा दाखल चव्हाण यांना ‘काय साहेब तुम्ही आमचा आवाज बंद केला’ असा सवाल केला.

हेही वाचा… नाना पटोले आणि आशिष शेलार यांचे हस्तांदोलन, संजय शिरसाठही सोबत; काय झाली चर्चा? वाचा…

दोन्ही नेत्यांची काही वेळाची भेट कॉंग्रेस जणांना भूतकाळात घेऊन गेली. नाशिक पदवीधर निवडणुकीत तांबे यांची उमेदवारी चांगलीच चर्चेत राहिली होती. फेब्रुवारी २३ मध्ये  झालेली ही निवडणूक काँग्रेस पक्षामधील अंतर्गत वादामुळे गाजली. पक्षाने सत्यजित ऐवजी त्यांच्या वडिलांना उमेदवारी दिली. ती सत्यजित यांना हवी होती. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी अर्ज न भरता सत्यजित यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्यामुळे कॉंग्रेसने सत्यजित तांबे आणि त्यांचे वडील सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित केले.  

हेही वाचा… “अहो भुजबळ, संवैधानिक पद आहे तर भाषणे सोडा अन् लोकांची कामे करा, नाही तर…” कोण देतोय असा सल्ला?

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे विजयी झाल्यानंतर सत्यजित यांचे मामा आणि काँग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या शिवसेना उमेदवार शुभांगी पाटलांचा पराभव झाला  होता. या सर्व घटनाक्रमामुळे सत्यजित कॉंग्रेसपासून दुरावले. मात्र ते मुळचे कॉंग्रेसचे असल्याने व मामा व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यामुळे सत्यजित यांचे कॉंग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांशी अत्यंत स्नेहाचे संबंध आहे. याच संबंधातून गुरूवारी अशोक चव्हाण यांनी त्यांना आवाज दिला व त्याला सत्यजित यांनी प्रतिसाद दिला.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे नेहमीच डिवचत असतात. आजही त्यांनी विधानभवन परिसरात गोगावलेंना मंत्रिपदावरुन डिवचल्याचं सर्वांनी पाहिलं.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legislative council member satyajit tambes reply to senior congress leader ashok chavan during parliament winter session in nagpur cwb 76 dvr