मुस्लीम आरक्षणावरून आमदारांची घोषणाबाजीमुस्लीम आरक्षणावरून आमदारांची घोषणाबाजी
मुस्लिम समाजातील मागासवर्गीय जातींना शिक्षणात ५ टक्के आरक्षण देण्याच्या मुद्दय़ावरून बुधवारी विधानसभेत मुस्लिम आमदारांनी घोषणाबाजी करून गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करण्यास भाग पाडले.
सकाळी अर्धातास चर्चा आणि प्रश्नोत्तरे झाल्यानंतर पुढील कामकाज सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच विरोधी पक्षातील नसीम खान मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. विधान परिषदेतील मंत्र्यांनी आरक्षणाच्या संदर्भात उलटसुलट उत्तरे दिल्याचे प्रसारमाध्यमांमध्ये उद्धृत झाल्याचा हवाला देत मुस्लिमांच्या आरक्षणाचा मुद्दा त्यांनी लावून धरला. मुस्लिम आरक्षणाच्या मुद्दय़ावर सर्वपक्षीय मुस्लिम एकत्र आल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील इतर आमदारही त्यांच्या मदतीला धावून आले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला. मंत्री सभागृहाची दिशाभूल करीत आहेत. अधिसूचनेची मुदत संपली असेल तर ती आजच वाढवावी आणि उच्च न्यायालयाचा सन्मान करावा, असे ते म्हणाले. तर धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण दिले गेले आहे, अशा प्रकारचा समज सरकारकडून पसरवला जात असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांना उद्देशून केली. दोनदा विरोधकांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत एकत्र येऊन घोषणाबाजी केली आणि कागदाचे तुकडे करून सभागृहात उधळले. या गदारोळात अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना सभा दोनदा तहकूब करावी लागली. त्याचवेळी सभागृहात दाखल झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून यासंदर्भात कुठलाही कायदा अस्तित्वात नसल्याने मुस्लिम आरक्षणासंदर्भात अधिसूचना काढता येत नाही. तसेच वरच्या सभागृहात राष्ट्रवादीने मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा लावून धरल्याने काँग्रेसलाही हा मुद्दा लावून धरावा लागत असल्याचे सांगत विरोधकांची विरोधाची धार बोथट केली.
निर्णय कायम- खडसे
महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मुस्लिम समाजातील ज्या विद्यार्थ्यांनी ५ टक्के आरक्षणाचा लाभ घेत वैद्यकीय, तांत्रिक किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश केला त्यांचे प्रवेश रद्द करण्यात येणार नाहीत, तसेच याच आरक्षणाचा लाभ घेत ज्यांनी नोकऱ्या संपादित केल्या त्यांनाही संरक्षण देण्यात येईल, अशी हमी त्यांनी दिली. तरीही मुस्लिम आमदारांनी विरोध कायम ठेवल्याने ‘गेल्या ६५ वर्षांत आपण आरक्षण का नाही मागितले. एवढे दिवस तर आपला आवाजही निघत नव्हता, अशी टीका मुस्लिम समाजाच्या आमदारांवर केली. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही तर ते घटनेच्या चौकटीत द्यावे लागेल, असे खडसे म्हणाले
विधानसभा दोनदा तहकूब
मुस्लीम आरक्षणावरून आमदारांची घोषणाबाजीमुस्लीम आरक्षणावरून आमदारांची घोषणाबाजी
Written by मंदार गुरव
First published on: 17-12-2015 at 04:34 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legislators slogans on muslim reservation