लोकसत्ता टीम
वर्धा : वादाचे दुसरे नाव म्हणजे येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ. विद्यार्थ्यांची गटबाजी, मस्ती, पोलीस तक्रारीने हे विद्यापीठ सतत चर्चेत राहिले. आता ते कमी की काय, गुरुजनवर्गही द्वाडपणा करू लागला असल्याचे चित्र आहे. कुलगुरुपदाची खुर्ची बळकावली, असा ठपका ठेवून विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने प्रा. लेल्ला कारुण्यकरा यांना प्रोफेसर पदावरून निलंबित केले आहे.
तत्कालीन प्रभारी म्हणून लेल्ला यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर डॉ. भीमराय मैत्री यांची नियुक्ती झाली. मात्र उच्च न्यायालयच्या नागपूर खंडपीठाने ती रद्द केली होती. त्याचवेळी न्यायालयाने नवा कुलगुरू नेमण्याचे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्रालयास दिले. दरम्यान प्रा. लेल्ला हेच कुलगुरूपदाच्या खुर्चीत बसू लागले. त्यांना कुलसचिवांनी न्यायालयीन आदेशाची प्रत मागतल्यावर लेल्ला यांनी मीच कुलगुरू असून मला कसल्याच आदेशाची गरज नसल्याचे ठणकावले. उलट कुलसचिव कथेरिया यांच्या निलंबनाचा आदेश काढला. विशेष म्हणजे, त्यांनी शिक्षण मंत्रालयाने बोलावलेल्या कार्यकारी परिषदेच्या सभेस रद्दबातल ठरविले. तसेच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण अपील फेटाळण्यात आले.
आणखी वाचा-नागपूर : ऊन-पावसाचा खेळ, उष्माघाताचे तीन संशयित मृत्यू!
मंत्रालयाच्या आदेशानुसार कार्यकारी परिषदेने निर्णय घेताना लेल्ला यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरू केली. तत्पूर्वी अध्ययन केंद्राच्या निदेशक पदावरून त्यांना निलंबित केले आहे. वरिष्ठ अधिष्ठाता कृष्ण कुमार हे प्रभारी कुलगुरू म्हणून जबाबदारी सांभाळतील.