चंद्रपूर: भरधाव वेगाने जाणारी वाहने वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. चंद्रपूर- गडचिरोली मार्गावरील मुल आयटीआय समोर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू तसेच घोडपेठ जवळ एका कोल्ह्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
गुरूवारी सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे गौतमी पाटील हिचा लावणी कार्यक्रम असल्याने परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने रसिक सावलीत दाखल झाले होते. या मार्गावर मोठ्या संख्येने भरधाव वाहनांची वर्दळ होती. शुक्रवारी सकाळी मुल जवळील आयटीआय समोरील रस्त्यावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. गौतमीच्या कार्यक्रमासाठी आलेल्या वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचा संशय वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा… ‘लाईनमन बचाव समिती’ची महावितरण समोर निदर्शने
वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल हाेवून पंचनामा केल्यानंतर चंद्रपूर येथील प्राणी उपचार केंद्रात डॉ. कुंदन पोडसेलवार यांनी शव विच्छेदन केले. यावेळी वनविभागाचे सहायक वनसंरक्षक शेळगे, वनपिरक्षेत्राधिकारी विरुटकर, दिनेश खाटे, भांडककर उपस्थित होते. भद्रावती जवळील घोडपेठ येथे एका कोल्ह्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.