बुलढाणा : मोताळा तालुक्यातील विशिष्ट परिसरात बिबट्याचा संचार वाढला आहे. जेमतेम काही दिवसांच्या कालावधीतच बिबट्याने चौघांवर हल्ले करून गंभीर जखमी केल्याने परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी वर्गात दहशत निर्माण झाली आहे.

 हा बिबट चालत्या दुचाकीवरील चालकांवर देखील हल्ले करीत असल्याने चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रविवारी, ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी बिबट्याने जेमतेम अर्ध्या तासाच्या अंतराने दोघा मोटार सायकल स्वारावर अचानक हल्ला करून दोघा युवकांना गंभीर जखमी केले. मोताळा तालुक्यातील रोहिणखेड उबाळखेड मार्गावर या घटना घडल्या.

हेही वाचा >>>अधिकार आहेत तर मग निर्णय का नाही घेत? न्यायालयाने थेटच विचारले…

धावत्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केल्याने रोशन सुरपाटणे आणि गजानन सोनुने (राहणार रोहिनखेड, तालुका मोताळा) असे जखमी युवकांची नावे आहे. रोशन सुरपाटणे हा दुचाकीने रोहिनखेड ते उबाळखेड रस्त्याने जात होता. यावेळी त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. हा हल्ला होऊन जेमतेम अर्धा तास होत नाही तोच बिबट्याने याच मार्गावरून जाणाऱ्या अन्य एका दुचाकी स्वार युवकावर देखील बिबट्याने भीषण हल्ला चढविला.

सलग दुसऱ्या घटनेत गजानन सोनुने हे गंभीर जखमी झाले. सोनुने हे आपल्या दुचाकीने घरी जात असताना बिबट्याने त्याच्या हाताला चावा घेतला. यामुळे रोहिखेड परिसरात एकच खळबळ उडाली. आजूबाजुचे गावकरी, शेतकरी घटनास्थळी धावून आले. काही जवाबदार ग्रामस्थांनी याची माहिती वन विभागाला दिल्यावर वन अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या दोघांवर प्राथमिक उपचार करून रात्री उशिरा बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. या दोघांची प्रकृती स्थिर असली तरी झालेल्या जखमा गंभीर स्वरूपाच्या आहे. रोहिखेड, नाईकनगर, उबाळखेड, नळकुंड परिसरात बिबट्याचा वावर  धोकादायकरित्या वाढला आहे. अलीकडच्या काळातील बिबट हल्ल्याची ही चौथी घटना आहे.

हेही वाचा >>>“निवडणूक जिंकणार कशी, ते सांगा ?” शरद पवारांचा इच्छुकांना खडा सवाल…

बिबट्याची दहशत

रोहिणखेड परिसर आणि वरनमुद गावासह, पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थ, शेतकरी, शेतमजूर बिबट्याच्या दहशतीमुळे भयभीत झाले आहे. दुसरीकडे वन विभागाचे अधिकारी ठोस कारवाई करीत नसल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे. बारा दिवसांत चार जण गंभीर जखमी झाल्यावरही वन  विभाग ठोस कारवाई करीत नसल्याने, वन अधिकाऱ्यांना गावकऱ्यांच्या बळीची प्रतीक्षा आहे की काय? अशी संतप्त विचारणा  गंभीर जखमी झालेल्या युवकांच्या परिवार आणि भयभीत, हवालदिल गावकऱ्यांतून होत आहे.

वन विभागातर्फे कारवाई कधी?

मध्यंतरी बुलढाणा तालुक्यातील गिरडा या गावातील युवकाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. यानंतर बुलढाणा वन अधिकारी,कर्मचारी यांनी विविध उपाययोजना केल्या. बिबटयाला पकडण्यासाठी गिरडा गाव परिसरात तीन पिंजरे लावण्यात आले होते. तसेच वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली होती. लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात तीन बिबट पकडण्यात आले होते. त्यामुळे रोहिणखेड परिसरात कारवाई करण्यासाठी वन विभाग अधिकाऱ्यांना मुहूर्त मिळणार तरी कधी? असा नागरिकांचा सवाल आहे.