चंद्रपूर : चांदा आयुध निर्माणीत दोन दिवसांपूर्वी बिबट्याला जेरबंद केल्यानंतर पुन्हा एका बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. वसाहतीतील सेक्टर पाचमध्ये बिबट्याने एका महिलेवर हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास घडली. जखमी महिलेला चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विमलादेवी टिकाराम (४२), असे जखमी महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे नागरिकांत प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा – नागपूर : बॅंकेतून काढलेली ९ लाखांची रक्कम भर दुपारी दुचाकीस्वारांनी पळवली
हेही वाचा – बुलढाणा : ‘‘ठाणेदार साहेब, आमचा चोरलेला पक्ष आणि धनुष्यबाणाचा तपास लावा हो!”
विमलादेवी नेहमीप्रमाणे सायंकाळी फिरायला निघाल्या असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. मानेच्या मागील भागाला गंभीर दुखात असल्याने त्यांना प्राथमिक उपचार करून चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच वनविभागाच्या पथकाने चांदा आयुध निर्माणी वसाहतीत पहाटेच्या सुमारास बिबट्याला जेरबंद केले होते. या लोकवस्तीत अनेक हिंस्त्र वन्यप्राण्यांचा वावर आहे. वनविभागाने आयुध निर्माणी प्रशासनाला मानवी वस्ती भागातील जंगलाची कटाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, अजूनपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. नागरिकांनी कुत्र्यांना सोबत घेऊ नये, कुत्रे पाळू नये आणि पहाटे आणि सायंकाळी रस्त्याने पायदळ तसेच दुचाकीने फिरू नये, अशा सूचना दिल्या होत्या. परंतु, याचे पालन केले जात नाही. या भागात ४ पिंजरे लावण्यात आले आहे.