शहरातील महादेव खोरी नजीकच्या जंगलात गुरुवारी बिबट्याचे दोन बछडे आढळून आले होते. आईपासून त्यांची ताटातूट झाली होती. बछडे आणि मादी बिबट्याची भेट घडवण्यात शनिवारी पहाटे वनविभागाला यश आले. दोन दिवसानंतर बिबट्याची ही पिल्ले आईच्या कुशीत विसावली.
गुरुवारी सकाळी नागरिकांना हे बछडे आढळून आले होते. या बछड्यांना वनविभागाच्या पथकाने सुरक्षितरीत्या ताब्यात घेतल्यानंतर वडाळी येथील वनउद्यानात ठवेले होते. दोन दिवस या ठिकाणी त्यांची देखभाल करण्यात आली. त्या दरम्यान वनविभागाने या बछड्यांसोबत मादी बिबट्याची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
हेही वाचा : अमरावती : शहरात बिबट्याचे बछडे आढळल्याने एकच खळबळ
शनिवारी सकाळी बिबट्यांच्या या दोन बछड्यांची आईसोबत वनविभागाच्या पथकाने भेट घडवून आणली. उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला, वनपाल अमोल गावणेर आणि त्यांच्या चमूने त्यासाठी बरेच परिश्रम घेतले. या बछड्यांना आता त्यांच्या नैसर्गिक अधिवासात आईसोबत राहता येणार आहे.
महादेव खोरी परिसराच्या जवळ वनविभागाने वनीकरण केले आहे.
हेही वाचा : नागपूर : दारू चोरून प्यायल्याच्या संशयावरून मजुराला पेटवण्याचा प्रयत्न ; नरखेड तालुक्यातील घटना
पोहरा-मालखेडच्या जंगलाचा हा भाग मानला जातो. गुरुवारी सकाळी काही जणांना या परिसरात बिबट्याचे दोन बछडे दिसून आले होते. या बछड्यांना त्यांच्या जन्मदात्रीकडे परत सोडण्याचे प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे यांनी व्यक्त केली होती. वनविभागाच्या या कामगिरीबद्दल यादव तरटे यांनी समाधान व्यक्त केले आहे.