नागपूर : जंगलाला लागून असणारेच नाही तर जंगलापासून काही अंतरावर असणाऱ्या रस्त्यांवरूनही भरधाव धावणारी वाहने वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. उमरेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या धडकेत बिबट मृत्युमुखी पडला. त्यामुळे जंगलालगतच्या रस्त्यांवर वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
उमरेड – नागपूर राष्ट्रीय महामार्ग ३५३ डी वर चांपा उपवन क्षेत्रातील व्हीआयटी महाविद्यालयाजवळील चक्री घाट परिसरात रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट मृत्युमुखी पडला. बुधवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली. बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच वन विभागाची चमू घटनास्थळी पोहोचली आणि पंचनामा करून बिबट्याला उत्तरीय तपासणीसाठी उमरेड येथे नेण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर जंगलालगतच्या रस्त्यावरून वेगाने धावणारी वाहने आणि या रस्त्यांवर वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या “मॅटिगेशन मेजर्स” ची गरज अधोरेखित झाली आहे. भारतात अनेक ठिकाणी जंगलाला लागून राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. काही ठिकाणी राष्ट्रीय महामार्गामुळे जंगलाचे विभाजन झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांमुळे वन्यप्राण्यांचा भ्रमणमार्ग खंडित झाला आहे, तर काही ठिकाणी वन्यप्राण्यांचा अधिवास विस्कळीत झाला आहे. त्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या वन्यप्राण्यांना भरधाव येणाऱ्या वाहनांची धडक बसून मृत्यू किंवा कायमच्या अपंगत्वाला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रातील व मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पाला लागून राष्ट्रीय महामार्ग ४४ गेला आहे. या महामार्गावर वन्यप्राण्यांसाठी भुयारी मार्ग करण्यात आले, मात्र अजूनही त्याठिकाणी भरधाव वाहनांच्या धडकेत वन्यप्राणी मृत्युमुखी पडत आहेत.
हेही वाचा >>>अकोला : नसबंदीला पुरुषांची नकारघंटा का?, महिलांनाच…
यात शेड्युल एकमधील वाघ, बिबट यांचाही समावेश आहे. गोंदियाजवळ नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पला लागून राष्ट्रीय महामार्ग आहे. या रस्त्यावर सुद्धा ” मॅटिगेशन मेजर्स”च्या अभावामुळे वन्यप्राणी मृत्युमुखी पडत आहेत. येथेही शेड्युल एकमधील वाघ, बिबट या वन्यप्राण्यांचा समावेश आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पालागत चंद्रपूर-मूल राष्ट्रीय महामार्गावर अलीकडेच एक वाघाचे कुटुंबीय भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांखाली येता येता बचावले. यात काही वेळासाठी वाघीण आणि तिच्या बछड्यांची ताटातूट झाली. मात्र, यापूर्वी या महामार्गावर वाघांसह बिबट्याचा बळी गेला आहे. तसेच ताडोबा जंगलालगतच पदमापूर-मोहर्ली रस्त्यावर सुद्धा अनेक वन्यप्राणी वाहनांखाली येऊन दगावले आहेत. “मॅटिगेशन मेजर्स” बाबत कधी वनखात्याची यंत्रणा पाठपुरावा करण्यात कमी पडते, तर कधी रस्ते बांधकाम यंत्रणा चालढकल करते. या दोन्ही यंत्रणांमध्ये ताळमेळ नसल्याने बळी मात्र वन्यप्राण्यांचा जात आहे. गुरुवारी सकाळी उमरेड-नागपूर महामार्गावर वाहनांच्या धडकेत बिबट मृत्युमुखी पडला. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला लागूनच हा मार्ग आहे. वन्यप्राण्यांचा हा भ्रमणमार्ग असून रस्ता ओलांडताना रात्रीच्या सुमारास बिबट्याला वाहनाची धडक बसली.