लोकसत्‍ता टीम

अमरावती : चांदूर रेल्‍वे मार्गावर एसआरपीएफ कॅम्‍प नजीक एक बिबट मृतावस्‍थेत आढळल्‍याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. अज्ञात वाहनाच्‍या धडकेने या बिबट्याचा मृत्‍यू झाल्‍याची शक्‍यता वर्तवण्‍यात येत आहे.

गेल्‍या काही दिवसांपासून शहरातील जंगला लगतच्‍या भागात बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्‍यातच आज सकाळी ६ वाजताच्‍या सुमारास एसआरपीएफ कॅम्‍प नजीक एक बिबट मृतावस्‍थेत आढळून आला. या मादी बिबट्याचे वय अंदाजे अडीच वर्षांचे आहे. या घटनेची माहिती वनविभागाला देण्‍यात आली. बिबट्याला पाहण्‍यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

आणखी वाचा-फाळणीची झळ, निर्वासितांचे हाल; नागपुरातील त्या कुंटुबांचे काय आहेत प्रश्न

सध्‍या पोहरा-मालखेडच्‍या जंगलात मानवी हस्‍तक्षेप वाढला असून विविध कार्यक्रमांच्‍या नावाखाली वृक्षतोड करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे अनेक वन्‍यप्राणी जंगलाकडे धाव घेत असून मानव-वन्‍यजीव संघर्ष तीव्र होण्‍याची भीती आहे. अज्ञात वाहनाच्‍या धडकेने या बिबट्याचा मृत्‍यू झाल्‍याची शक्‍यता आहे. जंगलातील मानवी हस्‍तक्षेप थांबविण्‍यासाठी कठोर उपाययोजना करण्‍याची गरज असल्‍याचे मत ‘वॉर’ या वन्‍यजीव संरक्षणाच्‍या क्षेत्रातील संस्‍थेचे अध्‍यक्ष नीलेश कांचनपुरे यांनी व्‍यक्‍त केले आहे.

Story img Loader