अमरावती : अमरावती- नागपूर महामार्गावर रहाटगाव नजीक वाहनाच्या धडकेत आज पहाटे बिबट्या ठार झाला. वाहनाच्या धडकेत बिबट्याचा हा महिनाभरातील चौथा बळी आहे. अमरावती शहरालगतच्या जंगलातून बिबट्यांचा शहरातील वस्त्यांमध्ये प्रवेश नवीन नसला, तरी अलीकडच्या काळात वाहनांच्या धडकेमुळे अनेक बिबट्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. बिबट्यांच्या अधिवासातील मानवी हस्तक्षेपाचे परिणाम आता जाणवू लागले आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची माहिती मिळताच वनविभागाचे पथक अमरावती- नागपूर महामार्गावर पोहोचले. वाहनाची जोरदार धडक बसल्याने गंभीर जखमी होऊन बिबट्याचा मृत्यू झाल्याचे वनविभागाच्या पथकाला निरीक्षणा दरम्यान दिसून आले. मृत बिबट्याला वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात नेण्यात आले. याच परिसरात वनविभागाचे अधिकारी आणि वन्यजीव समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात येणार आहेत. त्यानंतर वनविभागाच्या नियमानुसार अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
हेही वाचा >>>गोंदिया : ‘एके४७’ने स्वतःवर गोळी झाडून पोलीस हवालदाराची आत्महत्या
अमरावती शहरालगत असणाऱ्या चिरोडीच्या जंगलात गेल्या ७ डिसेंबर रोजी सकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या ठार झाला होता. या घटनेच्या लगेच दुसऱ्या दिवशी याच भागात आणखी एक बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेत दगावला. सलग दोन दिवस दोन बिबट्या एकाच मार्गावर ठार झाल्यामुळे खळबळ उडाली होती. यानंतर २० डिसेंबरला अमरावती-नागपूर एक्सप्रेस हायवेवर वडाळी ते महादेव खोरी दरम्यान गुणवंत बाबा मंदिरालगत दोन वर्षे वयाचा बिबट्या वाहनाच्या धडकेत ठार झाला होता. महिनाभरात अमरावती शहर आणि शहरालगत चार बिबट्या ठार झाल्याने वन्यजीवप्रेमींमधून चिंता व्यक्त होत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून अमरावती शहर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे.
हेही वाचा >>>चार हजार कि.मी. उड्डाण, पाच राज्यांतून प्रवास; तामिळनाडूत घेतला अखेरचा श्वास…
अमरावती- नागपूर महामार्गावरील रहाटगाव परिसरात रहिवाशांना अनेकदा बिबट्याचा दर्शन घडले आहे. यापूर्वी अर्जुन नगर, विभागीय आयुक्तालय परिसर या भागातील रहिवाशांना अनेकदा बिबट्याचा वावर दिसून आला. दोन्ही बाजूने डोंगर आणि जंगल असल्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात अनेकदा बिबट्याचे दर्शन घडते. काही दिवसांपुर्वी वन विभागाच्या बचाव पथकाने विद्यापीठ परिसरातून शर्थीचे प्रयत्न करून बिबट्याच्या पिल्ल्याला पिंजऱ्यात कैद केले होते.
रस्त्यावर वन्यप्राण्यांच्या होणाऱ्या अपघातांना रोखण्यासाठी काही उपाययोजना करण्यात येऊ शकतात. उड्डाणपूल, भुयारी मार्ग, बोगदे किंवा इतर मानवनिर्मित संरचनांच्या माध्यमातून प्राण्यांना रस्त्यांवरून न जाऊन मार्ग दाखवता येतो. यामुळे प्राणी-वाहन अपघात टाळता येतात आणि प्रजातींना त्यांच्या निवासस्थानातून सुरक्षित मार्ग मिळतो. वन्यजीव अपघात रोखण्यासाठी गती निरीक्षण प्रणालींचा वापर केला जातो. महामार्गांवर वन्यजीवांसाठी स्वतंत्र मार्ग असणे गरजेचे आहे.