सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरखेड येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ९ बकऱ्या दगावल्या. यामुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून परिसरातील पशुधन मालक धास्तावले आहेत.
हेही वाचा >>> राज्यातील पोलिसांना दिवाळीत पदोन्नती ; उपनिरीक्षक, साहाय्यक निरीक्षकांचा समावेश
पांगरखेड येथील शेतकरी कैलास भाऊराव शिंगणे यांच्या शेतात जनावरांचा गोठा आहे. त्यात त्यांनी बकऱ्या बांधल्या होत्या. बिबट्याने रात्री गोठ्यात शिरून नऊ बकऱ्यांचा फडशा पाडला. शिंगणे सकाळी शेतात गेले असता तेथील स्थिती पाहून त्यांना धक्काच बसला. नऊ बकऱ्या दगावल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान, बिबट्याच्या हैदोसामुळे येथील पशुधन मालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.