नागपूर : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर मुंबईवरून नागपूरकडे येताना महामार्गाच्या बाजूला वन्यजीवांसाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गाला लागून शेती आहे आणि शेतकऱ्यांनी त्याला कुंपण घातले आहे. नेमके या कुंपणात चार दिवसांपूर्वी मादी बिबट अडकली. वनखात्याने तिला वाचवले आणि उपचारासाठी आपल्याकडे आणले. मात्र, तिचे बछडे कदाचित समृद्धी परिसरातच होते. वनखात्याला याची जाणीव होताच तिच्यावर उपचार करुन तिला पुन्हा तिच्या अधिवासात परत पाठवण्यात आले.
समृद्धी महामार्गावर मुंबईवरून नागपूरकडे येताना महामार्गाच्या बाजूला वन्यजीवांसाठी उपशमन योजना तयार करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने भुयारी मार्गांचा समावेश आहे. या मार्गाला लागून असलेल्या शेताच्या तारेच्या कुंपणात चार दिवसांपूर्वी मादी बिबट अडकले. बुटीबोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद वाडे यांनी नागपूर येथील प्रादेशिक वनखात्याच्या अखत्यारीतील ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट’ केंद्राला घटनेची माहिती दिली. केंद्राची चमू तातडीने घटनास्थळी पोहचली. सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन बिबट्याला बेशुद्ध न करताच यशस्वीरित्या कुंपणातून सोडवून वन्यप्राण्यांच्या रुग्णवाहिकेत टाकण्यात आले. तारेच्या कुंपणात अडकल्याने बिबट्याच्या शरीरावर किरकोळ जखमा झाल्या होत्या.
समृद्धी महामार्गावर अडकले बिबट, बचाव कार्य आणि सुटकाही https://t.co/2jrmCKvB4K#viralvideo #leopard #socialmedia pic.twitter.com/J86PJly4Ms
— LoksattaLive (@LoksattaLive) April 17, 2025
त्यामुळे उपचारासाठी त्याला ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट’ केंद्रात आणले. प्रादेशिक वनखात्याचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक मनोज धनविजय, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद वडे, राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते यांच्या नेतृत्वाखाली हे सगळ्यात वेगवान ‘फिजिकल रेस्क्यू’ ऑपरेशन यशस्वीपणे पार पडले. या मोहीमेत हरीश किनकर, प्रतीक घाटे, सानप, आंधळे, समीर नेवारे हे सर्व वनरक्षक तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश फुलसुंगे, डॉ. सिद्धांत मोरे तसेच बंडू मंगर, खेमराज नेवारे, विलास मंगर, आशिष महाले सहभागी होते.
या मादी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली असता तिने नुकताच बछड्यांना जन्म दिला असल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या पशुवैद्यकांना जाणवले. त्यामुळे तिच्या बछड्यांची शोधाशोध करण्यासाठी वनखात्याने पुन्हा मोहीम राबवली. रात्रंदिवस बछड्यांचा शोध घेतला, पण ते दिसून आले नाही. मात्र, त्यांच्यासाठी तिला सोडणे आवश्यक असल्याने आज तिला लगेच तिच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. पिंजऱ्याचा दरवाजा उघडताच त्या मादी बिबट्याने धूम ठोकली.