अमरावती : गेल्या रविवारी अमरावती हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले आणि वाढत्या तापमानासोबतच शहरातील वृक्ष आच्छादनाची चर्चा सुरू झाली. गेल्या काही वर्षांत विकासाच्या नावाखाली वृक्षांची बेसुमार कत्तल करण्यात आली. त्याचे दुष्परिणाम आता जाणवू लागले आहेत.
शहरात वाढते कॉँक्रिटीकरण पाहता, यासाठी होणारी वृक्षतोड शहराचे तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहे. ऋतुचक्राप्रमाणे असणारा चार महिन्यांचा उन्हाळा अमरावतीकरांना किमान सहा ते साडेसहा महिन्यांचा जाणवतो. शहराच्या वाढत्या तापमानाला वृक्षांची कमतरता हे एक मुख्य कारण ठरले आहे.
अमरावती महापालिकेने २००८-०९ मध्ये वृक्षगणना केली होती, त्यावेळी शहरात ५ लाख ४८ हजार ७३२ झाडांची नोंद करण्यात आली होती. सद्यस्थितीत किती वृक्ष आहेत, याची आकडेवारीच उपलब्ध नाही. खुल्या जागेत, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यासाठी बृहत आराखडा तयार करण्यात आला. महापालिकेच्या या आराखड्यानुसार शहरात १ हजार २१८ मोकळ्या जागा आहेत. एकूण ६७ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. दुतर्फा म्हणजे १३४ किलोमीटर अंतरावर वृक्ष लागवड करता येऊ शकते, त्यासाठी १ लाख ११ हजार ८५९ वृक्षांची गरज आहे. एकूण खर्च ८.२७ कोटी रुपये अपेक्षित आहे. उपलब्ध आर्थिक तरतुदीनुसार वर्षनिहाय वेगळी अंदाजपत्रके करणे अपेक्षित आहे. रहदारीच्या रस्त्यांवर अतिक्रमणामुळे किंवा पूर्व नियोजनाअभावी वृक्ष लागवड शक्य नसल्याचे महापालिकेच्या अहवालातच नमूद आहे.
रस्त्याच्या कडेला असलेली झाडे पेटविणे, रात्रीतून ती तोडणे, घरकामासाठी विना परवानगी मोठ्या वृक्षांना जमीनदोस्त करण्याचे प्रकार वाढले आहेत.
वारसा वृक्ष जगविण्याची गरज..
शहरात सध्या ९४९ ‘हेरिटेज’ (वारसा) वृक्ष आहेत. ज्या वृक्षांचे वय हे किमान ५० वर्षांपेक्षा जास्त आहे. शहरातील अशा वृक्षांचे संरक्षण व जतन करण्यासाठी त्यांचा‘हेरिटेज’ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. शासनाच्या आदेशानुसार मार्च २०२२ मध्ये ही गणना करण्यात आली होती.
या गणनेत सर्वाधिक ४७० कडुनिंबाचे, २१० पिंपळाचे, १२० वडाचे, ७० चिंचेचे, १७ उंबराचे तर १० शिसमचे ‘हेरिटेज’ वृक्ष आढळले आहेत.
कारवाई व्हावी..
शहरात तसेच ग्रामीण भागात काही लोक कडूनिंब, जांभूळ, काट सावर, आंबा, हीवर, बाबुळ व इतर प्रकारच्या वृक्षांची कत्तल करून त्याची वाहतूक करत आहेत. या वृक्षांवर अधिवास असलेल्या पक्ष्यांच्या घरटी, पिले आणि अंडी सुद्धा नष्ट केल्या जात आहेत. तक्रार करूनही कारवाई होत नाही. वृक्षतोड करणाऱ्यांवर आणि त्यांना सहकार्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. – नीलेश कंचनपुरे, अध्यक्ष, वाईल्डलाईफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेल्फेअर सोसायटी.