नागपूर : वर्धा, नागपूर आणि अमरावती हे तीन जिल्हे वगळता विदर्भातील सर्व जिल्ह्यांनी जुलै महिन्यातील पावसाची सरासरी ओलांडली असली तरी यंदा एक जून ते २३ जुलैपर्यंत झालेला एकूण पाऊस हा याच काळात मागच्या वर्षी झालेल्या पावसाच्या तुलनेत कमी आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या अहवालातील नोंदीतून ही बाब स्पष्ट होते.
जून कोरडा गेला आणि जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने जोर धरला. त्यामुळे सध्या काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली. विदर्भात पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भातील चंद्रपूरला पावसाचा फटका बसला. १ जून ते २४ जुलैपर्यंत (सकाळपर्यंत) जिल्हानिहाय पावसाच्या नोंदीनुसार यंदा विदर्भातील अकरा जिल्ह्यांपैकी अमरावती, वर्धा आणि नागपूर या तीन जिल्ह्यांचा अपवाद सोडला तर इतर सर्व जिल्ह्यांनी जुलै महिन्याची सरासरी ओलांडली. खुप पाऊस झाल्याची चर्चा सुरू झाली. मात्र मागच्या वर्षीच्या (२०२२) तुलनेत यंदा (१ जून ते २४ जुलैपर्यंत) पाऊस कमी झाला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात यंदा आतापर्यंत सरासरीच्या १०२ टक्के पाऊस झाला, मागच्या वर्षी याच काळात हे प्रमाण १२७ टक्के होते. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंतची टक्केवारी ९४ टक्के आहे, मागच्या वर्षी ती तब्बल १६४ टक्के होती. वर्धा जिल्ह्यात सरासरीच्या ८२ टक्केच पावसाची नोंद झाली, मागच्या वर्षी याच काळात जिल्ह्यात २०२ टक्के पाऊस झाला होता. कमी, अधिक प्रमाणात अशीच सर्व जिल्ह्यांची स्थिती आहे. हवामान खात्याने पुढच्या काळात व ऑगस्ट महिन्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हेही वाचा – बोगस बियाणे विक्री राज्यव्यापी; खासदार तडस यांची लोकसभेत सीबीआय चौकशीची मागणी
विदर्भातील पाऊस (मि.मी. १ जून ते २४ जुलै २०२३ पर्यंत)
जिल्हा, सरासरी, प्रत्यक्ष, टक्के, मागच्या वर्षीचा
बुलढाणा २८८ २९४ १०२ ३६६ (१२७ टक्के)
अकोला ३०९ ३११ १०० ३६७ (११८ टक्के)
वाशीम ३५५ ४०३ ११३ ४४१ (१२४ टक्के)
अमरावती ३६० ३२६ ९० ४४८ (१२४ टक्के)
यवतमाळ ३६२ ४९२ १३५ ५९९ (१६५ टक्के)
वर्धा ३८५ ३१९ ८२ ७८० (२०२ टक्के)
नागपूर ४०२ ३८० ९४ ६६२ (१६४ टक्के)
भंडारा ४८५ ५३२ १०९ ६२५ (१२८टक्के)
गोंदिया ५१४ ५५० १०७ ६८९ (१३४टक्के)
चंद्रपूर ४६० ४९८ १०८ ८२३ (१७८टक्के)
गडचिरोली ५४२ ६८० १२५ ९७२ (१७९ टक्के)