नामिबियाहून आणलेल्या चित्त्यांसाठी कुनो राष्ट्रीय उद्यानातील जागा कमी पडत असल्याने नवा अधिवास शोधण्यात आला आहे. त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यांत गांधीसागर अभयारण्य चित्त्यांसाठी अधिवास म्हणून विकसित करण्याचे आदेश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी वनाधिकाऱ्यांना दिले आहेत.

चित्त्यांना कुनो राष्ट्रीय उद्यानातील मोकळय़ा जंगलात सोडल्यानंतर ‘पवन’ नामक चित्ता वारंवार उद्यानाच्या बाहेर जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. पहिल्यांदा तो बाहेर गेल्यानंतर त्याला उद्यानात परत आणले गेले. आता पुन्हा तो उद्यानाच्या बाहेर गेला असून वाघांच्या अधिवासात शिरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो शिवपुरीच्या माधव राष्ट्रीय उद्यानाशिवाय जवळच्या परिसरात फिरत आहे. शुक्रवारी त्याने कोटा-झांसी चारपदरी महामार्ग ओलांडून सरदारपुरातील एका शेताजवळ वासराची शिकार केली. एका रात्रीत त्याने ३५ किलोमीटर अंतर पार केले आणि गेल्या काही दिवसांपासून तो याच परिसरात स्थिरावला आहे. मादी चित्तादेखील या परिसरात आल्यास येथे मानव-वन्यजीव संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळेच चित्त्यांसाठी नवा अधिवास विकसित करणे क्रमप्राप्त आहे.

कुनोचे क्षेत्र चित्त्यांसाठी पुरेसे नसल्याचे मत यापूर्वीही अनेकदा तज्ज्ञांनी मांडले होते. मध्य प्रदेश वन्यजीव सल्लागार मंडळाच्या बैठकीत मंडळाचे सदस्य अभिलाष खांडेकर यांनी चित्त्यांसाठी नव्या घराचा शोध घेण्याचा प्रस्ताव मांडला होता. मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गांधीसागर अभयारण्य चित्त्यांसाठी नवा अधिवास म्हणून येत्या सहा महिन्यांत विकसित करण्यात यावे, अशा सूचना केल्या.

राजस्थानचाही पर्याय?

चित्ता प्रकल्पाचा प्रस्ताव तयार झाला त्या वेळीच मध्य प्रदेशसह राजस्थानमधील वनक्षेत्राचीही निवड अधिवासासाठी करण्यात आली होती. त्यामुळे गांधीसागर अभयारण्य येत्या सहा महिन्यांत चित्त्यांचा अधिवास म्हणून विकसित न झाल्यास राजस्थानला चित्ते हलवले जाऊ शकतात, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

चित्त्यांची संख्या वाढणार

  • ’चित्ता प्रकल्पाची आखणी झाली त्या वेळीच चित्त्यांसाठी वेगवेगळय़ा अधिवासाची चाचपणी करण्यात आली. त्यातील काहींवर शिक्कामोर्तबही करण्यात आले होते.
  • ’कारण या प्रकल्पानुसार भारतात आणखी चित्ते आणण्यात येणार आहेत. नामिबियाहून आणलेल्या मादी चित्त्याने चार शावकांना जन्म दिला आहे. त्यामुळे चित्त्यांची संख्या वाढणार हे निश्चित आहे.
  • ’म्हणूनच मी तातडीने नवा अधिवास शोधण्याबाबतचा प्रस्ताव मी सादर केला होता, असे मध्य प्रदेश वन्यजीव मंडळाचे सदस्य अभिलाश खांडेकर यांनी सांगितले.

Story img Loader