गोंदिया : यंदा पावसाने सर्वांचेच टेन्शन वाढवले आहे. यामुळेच पाऊस शेवटच्या टप्प्यात असतानाही जिल्ह्यातील ३२ मध्यम व लघु प्रकल्पांपैकी केवळ पाच प्रकल्पांत १०० टक्के पाण्याचा साठा आहे. मात्र, इतर प्रकल्पांमध्ये पाणी नसल्याने अनेक प्रकल्प रिकामेच आहेत. अशा स्थितीत मुसळधार पावसाची नितांत गरज आहे, मात्र, तसे न झाल्यास पुढील वर्ष कठीण जाईल.
यावर्षी जून महिन्यात पावसाने दया दाखविली नाही. त्यामुळे जून महिना दुष्काळी निघाला. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने शेतीची कामे सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. जुलै महिन्यातील पावसामुळे नद्या, कालवे, प्रकल्पांमध्ये पाणी जमा झाले. मात्र, ऑगस्ट महिन्यात काहीसा पाऊस पडल्यानंतर पाऊस गायब झाला. परिणामी प्रकल्पांना पाणी मिळाले नाही आणि त्यांची तहान अद्यापही शमलेली नाही. आता पावसाळा शेवटच्या टप्यात असून ३० सप्टेंबरपर्यंत सतत मुसळधार पावसाची गरज आहे. कारण तसे झाले नाही तर पुढचे वर्ष अडचणींनी भरलेले असेल यात शंका नाही.
जिल्ह्यात ९ मध्यम आणि २३ लघु प्रकल्प आहेत. यापैकी फक्त कटंगी मध्यम प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा आहे. डोंगरगाव, मोगरा, बेवारटोला आणि भुराटोला या चार लघु प्रकल्पांतदेखील १०० टक्के पाणीसाठा आहे. या शिवाय बोदलकसा, चुलबंद, रेंगेपार या तीन मध्यम प्रकल्पात आणि आक्टीटोला, पिपरिया, राजोली, साडेपार, जुनेवाणी आणि उमरझरी या सहा लघु प्रकल्पांमध्ये ७५ टक्के पाणीसाठा आहे. उर्वरित प्रकल्पांत यापेक्षा कमी साठा आहे.
‘या’ प्रकल्पांची अवस्था दयनीय
जिल्ह्यातील काही लघु प्रकल्पांतील पाणीसाठा नाममात्र असून त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. यात गुमडोह प्रकल्पात ३४.५३ टक्के, कालीमाटी प्रकल्पात २०.८४ टक्के, रेहारी प्रकल्पात ३७.९९ टक्के, सोनेगाव प्रकल्पात २८.६७ टक्के, सालेगाव प्रकल्पात २८.३५ टक्के पाणीसाठा आहे. तर ओवारा प्रकल्पात केवळ ४९.५७ टक्के आहे.
गेल्या वर्षी भरले होते काठोकाठ
गतवर्षी जिल्ह्यावर वरुण देवाने मेहरबानी केली होती. मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गतवर्षी जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प तसेच मध्यम व लघु प्रकल्प जलमय झाले होते. मात्र, यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. परिणामी प्रकल्प अद्यापही रिकामेच आहेत. आता उर्वरित कालावधीत दमदार पाऊस आल्यास प्रकल्प भरतील. अन्यथा येत्या उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.