राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केले वाहन

अग्निशमन वाहने वेळेत पोहोचूनही बरेचदा आगीवर नियंत्रण मिळवणे अवघड काम असते. आग मोठी असेल तर तिच्या मुळापर्यंत जाणे कठीण जाते. यावर राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्याय शोधला आहे. त्यांनी तयार केलेले ‘मल्टी युटिलिटी मिस्ट वेहिकल’ सर्वच अडचणींवर मात करून कमी पाण्यात, कमी वेळात आग विझवण्यास उपयोगी पडते. विद्यार्थ्यांनी ही यंत्रणा अवघ्या २५ हजार रुपयात तयार केली आहे.

आगीच्या ठिकाणी पोहोचणारा रस्ता अरुंद असेल तर अग्निशमन वाहने तेथे पोहोचू शकत नाही. अशावेळी वाहन दूर उभे करून पाण्याचा मारा केला जातो. मात्र, विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही अग्निशमन यंत्रणा अडचणीच्या ठिकाणी पोहोचू शकते. तिला दुरून  रिमोट कंट्रोलद्वारे हाताळता येते. त्यामुळे बाहेरून विझलेली पण आत धुमसत असलेल्या आगीवर नियंत्रण मिळवता येते.

विशेष म्हणजे, या यंत्रणेत कमी पाण्याचा वापर केला जातो. हे वाहन सैन्याच्या वाहनांप्रमाणे ‘चेन लिंक’ने चालते. त्यामुळे अडचणीच्या मार्गातूनही ते आगीच्या ठिकाणी सहजपणे पोहोचू शकते. या यंत्रणेद्वारे आगीच्या तीन घटकांपैकी दोन घटकांवर एकाचवेळी नियंत्रण मिळवता येऊ शकते. धुरावरही नियंत्रण मिळवता येत असल्याने जवानांना काम करणे सोपे जाते. आधी आगीची धग कमी करून मग आगीवर नियंत्रण मिळवता येते. यात असलेल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आगीचा आढावा घेतला जाऊ शकतो.

‘‘पाण्याचे कण जितके बारीक असतील तितके आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश येते. त्यात आणखी काय नवे करता येईल, याचा शोध आम्ही घेत आहोत. हा प्राथमिक स्तरावरील प्रयोग आहे. आम्ही विद्यार्थ्यांनी मिळून पैसे जमा केले आणि २५ हजार रुपयात ते तयार केले. व्यावसायिक स्तरावर त्यासाठी किमान दोन लाख रुपयाचा खर्च येणार आहे. या यंत्रणेसाठी पेटंट मिळवण्याच्या तयारीत आम्ही आहोत.’’

– अथर्व ढोमणे, शशिधर वर्मा, रूपक चौधरी, गुरसंतसिंग बक्शी-

Story img Loader