गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील नारगुंडा गावात गुरुवारी इंटरनेट ‘वाय-फाय’ सुविधेसह सुसज्ज अशा वाचनालयाचा सरपंच पूनम पदा व प्रभारी पोलीस अधिकारी मयूर पवार यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला. पोलीस विभागाच्या पुढाकाराने हे वाचनालय उभारण्यात आले असून, या भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना अभ्यास सुसह्य होणार आहे.
नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावे आजही मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत शासकीय सोयीसुविधा पोहोचवणे शक्य होत नाही. भामरागड तालुक्यातील अशाच नारगुंडा या अतिसंवेदनशील गावात पोलीस विभागाने इंटरनेट, ‘वाय-फाय’ सुविधा असलेले सुसज्ज वाचनालय सुरू केले आहे. गुरुवारी सरपंच पूनम पदा, नारगुंडा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी मयूर पवार, हलवेर, खंडीसह हद्दीतील गावांचे पाटील, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक यांच्या उपस्थितीत ग्रामदिंडी काढण्यात आली. त्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत या वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात दुर्गम भागात अशाप्रकारचे उपक्रम पोलीस विभाग राबवत आहे.
हेही वाचा – आशीष देशमुख काँग्रेसमधून निलंबित; स्वपक्षीय नेत्यांवर टीका भोवली
साईनाथची हत्या याच हद्दीत झाली
महिनाभरापूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या साईनाथ नोरोटे या तरुणाची नक्षल्यांनी डोक्यात गोळी झाडून क्रूरपणे हत्या केली होती. तो मर्दहुर या गावातील रहिवासी होता. हे गाव नारगुंडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येते.