नागपूर : भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती बँकेचे अध्यक्ष असलेल्या व विदर्भातील मोठ्या सहकारी बँकांपैकी एक असलेल्या मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बुधवारी रद्द केला आहे. त्यामुळे आता मलकापूर बँकेला बँकिंग व्यवसाय करता येणार नाही.
मलकापूर बँकेकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नाही, ही बँक ठेवीदारांचे पैसे परत करू शकत नाही, म्हणून मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केल्याचेही आरबीआयच्या पत्रात नमूद आहे. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी बँकेची आर्थिक स्थिती खालावल्याने आरबीआयने निर्बंध लादले होते. यावेळी बँकेच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी वेळ देण्यात आला. परंतु, दीड वर्षात स्थिती न सुधारल्याने ही कारवाई झाली.
हेही वाचा >>>पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये मानसिक आजार जास्त; ‘इन्स्टिटय़ूट ऑफ मेंटल हेल्थ’च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
मलकापूर बँकेची स्थिती खालावल्याने रिझर्व्ह बँकेने २४ नोव्हेंबर २०२१ रोजी बँकेवर निर्बंध लादले. यावेळी ग्राहकांना खात्यातून दहा हजारांहून अधिकची रक्कम काढण्यास मनाई केली गेली. बचत आणि चालू खात्यांसाठीही निर्णय लागू होता. रिझर्व्ह बँकेकडून या बँकेवर सहा महिन्यांपर्यंत निर्बंध घालण्यात आले होते. नंतर, मे महिन्यात पुन्हा ऑगस्टपर्यंत निर्बंध वाढवले होते. आरबीआयच्या पूर्व मंजुरीशिवाय बँक कोणतेही कर्ज नूतनीकरण करणार नाही. कोणतीही गुंतवणूक करणार नाही, कोणाकडूनही उधार घेणे किंवा नवीन ठेवी स्वीकारणार नाही असे निर्बंध टाकण्यात आले होते. बँक कोणतीही मालमत्ता विकण्यासही निर्बंध होते, हे विशेष.
हेही वाचा >>>“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील”, बावनकुळेंनी केले स्पष्ट; म्हणाले, “राष्ट्रवादीमुळे भाजपात अस्वस्थता नाही”
नागपूरसह राज्यात २८ शाखा
मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मलकापूर, पुणे, औरंगाबाद, नागपूर, वर्धा, अकोला, जळगाव, भुसावळ, मेहकर, चिखली, भोकरदन, सिल्लोड, मूर्तिजापूर मिळून एकूण २८ शाखा आहेत. एक हजार कोटींच्या वर ठेवी असलेली ही बँक आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये ग्राहकांचे ‘केवायसी नॉर्म्स’मध्ये गडबड आढळल्यावर बँकेला दोन लाखांचा दंडही ठोठावला होता.