नागपूर : महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्राचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पवन चढ्ढा यांनी दौऱ्यात नागपूर आणि विदर्भातील लष्कारच्या विविध आस्थपानांना भेटी दिल्या व विविध बाबींचा आढावा घेतला.
पवन चढ्ढा यांनी १२ ते १५ मे २०२४ या कालावधीत नागपूर, कामठी आणि पुलगाव येथील लष्करी आस्थापनांना भेट दिली. लेफ्टनंट जनरल पवन चढ्ढा यांनी १३ मे २०२४ रोजी उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उपक्षेत्राच्या सीताबर्डी किल्ला परिसरातील मुख्यालयाला भेट दिली. यावेळी मेजर जनरल एस. के. विद्यार्थी यांनी युद्ध आणि शांतता काळातील उपक्षेत्राच्या तयारीबद्दल माहिती दिली. यामध्ये मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण, माजी सैनिकांसाठी कल्याणकारी उपक्रम, सीताबर्डी किल्ल्याचे हेरिटेज टूर आणि पायाभूत सुविधांच्या विकास योजनांमध्ये बजावण्यात येणारी सक्रिय भूमिका समाविष्ट आहे. या बद्दल सविस्तर माहिती दिली.
हेही वाचा >>>खिचडी कमी वाढल्याच्या कारणावरून पतीने केली पत्नीची हत्या; चिखलदरा तालुक्यातील धक्कादायक घटना
चढ्ढा यांनी १४ मे २०२४ रोजी मध्यवर्ती दारुगोळा आगार, पुलगावला भेट दिली. यावेळी चढ्ढा यांना येथील नवीनतम तंत्रज्ञान सुरक्षा व्यवस्था आणि नवीन पायाभूत सुविधा प्रकल्प विकसित करण्याच्या योजनांबद्दल माहिती देण्यात आली. त्यांना स्टेशनमधील सुधारणा आणि संचालनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी लॉजिस्टिक विकास क्षमतेबद्दल देखील माहिती देण्यात आली.
त्यानंतर पवन चढ्ढा यांनी १५ मे २०२४ रोजी मिलिटरी स्टेशन कामठीला भेट दिली. त्यांना अग्निवीर प्रशिक्षण सुविधांच्या अद्यावतीकरणाबद्दल माहिती देण्यात आली. तसेच कामठी येथील गार्ड्स रेजिमेंट सेंटर येथे सुरू असलेल्या प्रशिक्षणाचे प्रात्याक्षित दाखवण्यात आले. त्यांना ओटीए (एनसीसी) आणि कामठी येथील इतर युनिट्सला भेट दिली आणि अधिकारी, भर्ती आणि प्रशिक्षण कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी घेतली आणि सर्व पदांना राष्ट्रसेवेत उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. १५ मे २०२४ रोजी, जीओसी यांची भेट इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेडला देखील भेट दिली.