नागपूर : काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर या प्रदेशात सकारात्मक बदल घडून येत आहेत. परंतु, दहशतवाद्यांच्या ते पचनी पडलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी गैरमुस्लिमांना काश्मीरमध्ये येऊ देणार नाही हे सांगण्यासाठीच पर्यटकांमधील गैरमुस्लिमांना वेगळे करून ठार मारले, असे निरीक्षण लेफ्टनंट जनरल (निवृत्त) आर.आर. निंभोरकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना नोंदवले.
निंभोरकर म्हणाले, काश्मीरमध्ये यापूर्वी पर्यटकांमधील गैरमुस्लिमांना मारण्याची घटना घडलेली नाही. अशा घटनांमुळे पर्यटनावर परिणाम होतो. त्यामुळे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना सहानुभूती मिळत नाही. परंतु, यावेळी त्यांनी तेच केले. याचे कारण शोधताना अलीकडच्या तीन घटनांकडे डोळसपणे बघावे लागेल. अमेरिकेचे उपराष्ट्रपती भारत दौऱ्यावर असणे, पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाने वक्तव्य करणे आणि गैरमुस्लीम पर्यटकांना ठार मारणे या त्या तीन घटना आहेत. गुलमर्ग, सोनमर्ग येथेही पर्यटि होते. पण, हल्लेखोरांनी पहलगाम निवडले. त्याचे कारण, ज्या ठिकाणी त्यांनी हल्ला केला तेथून काही अंतरावर ‘तराल’ नावाचे एक गाव आहे. या गावातून दहशतवाद्यांना मदत मिळते. गावातून पहाड ओलांडले की लगेच बैसरनमध्ये पोहचणे शक्य होते. त्यामुळे त्यांनी हे स्थळ निवडले असावे. हा भाग अतिशय दुर्गम असून येथे पायी किंवा घोड्यावरूनच जावे लागते. तेथे पोहचून दहशतवाद्यांना प्रतिउत्तर देणे सोपे काम नाही.
महत्त्वाचे म्हणजे दहशतवादी पर्यटनस्थळावर एवढ्या मोठ्या प्रमाणात हल्ला करतील, असा विचार सुरक्षा यंत्रणांनी केला नव्हता. पण, याला आपण गुप्तचर विभागाचे अपयश म्हणू शकत नाही. हे होणार, ते होणार म्हणून गुप्तचर विभागाकडून माहिती येत असते. त्या-त्या दिवशी त्यासंदर्भात खबरदारी घेतली जाते. पण, पर्यटकांवर हल्ला झाला ते ठिकाण लष्कराच्या चौकीपासून बऱ्याच अंतरावर आहे. तेथे सैन्याला पोहोचण्यासाठी किमान अर्धा ते एक तास लागतो. त्यामुळे दहशतवाद्यांनी बैसरनध्ये हल्ला केला असावा, असेही निंभोरकर म्हणाले.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागील कारणमिमांसा लेफ्टनंट जनरल (निवृत्त) आर.आर. निंभोरकर यांनी केली. चंद्रपूर सैनिक स्कूलचे श्रेय मुनगंटीवार यांचे चंद्रपूर सैनिक स्कूलच्या पहिल्या तुकडीतील पाच विद्यार्थ्यांची एनडीएसाठी निवड झाली. हा चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे. ही शाळा नवीन आहे. सातारा सैनिक स्कूल जुने आहे. यावर्षी या शाळेतील एक विद्यार्थ्याची एनडीएसाठी निवड झाली. चंद्रपूर सैनिक स्कूल उभारण्याचे सगळे श्रेय राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आहे. ते नसते तर हे झाले नसते. मी त्यांना २०१५ मध्ये कल्पना दिली. ती त्यांनी उचलून धरली. विधानसभेत ठराव संमत करून घेतला. सरंक्षण मंत्रालयातून परवानगी आणली. सव्वाशे एकर जमिनीचे तातडीने अधिग्रहण करवून घेतले आणि कमीत कमी खर्चात दोन वर्षांत उत्तम स्कूल उभारण्यात आले. देशातील सर्वोत्तम स्कूलपैकी हे एक आहे, अशी माहिती निंभोरकर यांनी दिली.
भारताकडून लगेच प्रत्युत्तराची शक्यता कमी
सध्या पाकिस्तान तयारीत आहे. त्यामुळे भारत ऊरी किंवा बालाकोटसारखे अनपेक्षित प्रत्युत्तर देण्याची शक्यता कमी आहे. पण, हल्लेखोरांना शोधून खात्मा केला जाऊ शकतो. ते इतक्या लवकर सीमापार जाणे अशक्य आहे. याशिवाय पाकिस्तानची अर्थव्यवस्था कृषी आधारित आहे. आपण, त्यांना चिनाब, झेलम, सिंधू नदीचे पाणी देतो. त्यांना पाणी देणे बंद केल्यास त्यांचे जगणे कठीण होऊन जाईल. पण, त्याचा लगेच परिणाम दिसणार नाही. त्यासाठी आठ-दहा वर्षे लागतील. त्यासाठी पायाभूत सुविधा तयार कराव्या लागतील आणि पाणी वळवावे लागेल. या अतिरिक्त पाण्याचा वापर वीजनिर्मिती करण्यासाठी आणि काश्मीर खोऱ्याला सिंचनासाठी होऊ शकतो, याकडे निंभोरकर यांनी लक्ष वेधले.
शिमला करार, अण्वस्त्र धमकीचा उपयोग नाही
पाकिस्ताने शिमला करार मोडण्याची धमकी दिली आहे. यात त्यांचेच नुकसान आहे. तसेही त्यांनी तो करार कधी पाळला नाही. दहशतवादी पाठवून लुडबुड करणे, नियंत्रण रेषेचा आदर न करणे आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन ते वारंवार करीत आहेत. तसेच ते अण्वस्त्र वापरण्याचीही धमकी देत आहेत. ते वापरणे एवढे सोपे नाही. भारताकडे पाकिस्तानपेक्षा अनेकपट अण्वस्त्र शक्ती आहे. भारताने वापर केला तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरून नष्ट होईल, असेही निंभोरकर म्हणाले.