यवतमाळ : किरकोळ भांडणात पत्नीच्या अंगावर केरोसिन ओतून तिला जिवंत जाळले. यावेळी पतीच्या आईनेही सुनेला जाळण्यास प्रोत्साहित केले. या घटनेत पत्नी गंभीर भाजली आणि तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आठ वर्षांनंतर या घटनेचा निकाल लागला आणि न्यायालयाने आरोपी पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिशिरकुमार हांडे यांनी बुधवारी दिला.
प्रशांत कृष्णराव लुटे (३५, रा. फ्रुट मार्केट,यवतमाळ), असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अश्वीनी प्रशांत लुटे, असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा विवाह २ मे २०१४ रोजी प्रशांतसोबत झाला होता. पती, सासू व नणंद त्रास देत असल्याने अश्वीनीने महिला व बाल विकास संस्था, नागपूर यांच्याकडे तक्रार दिली होती. दरम्यान ६ एप्रिल २०१६ रोजी तिला जिवंत जाळण्यात आल्याचा आरोप अश्वीनीच्या नातेवाईकांनी केला. तिला उपचारासाठी वैद्यकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. तिची मृत्यूपूर्वी जबानी कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समक्ष डॉक्टरांच्या उपस्थितीत झाली. घटनेच्या दिवशी पतीने भांडण केले आणि साखळीने मारहाण केली. यावेळी सासूही उपस्थित होती. पतीने अगांवर रॉकेल टाकून पेटवून दिले. त्यावेळी पती व सासू दोघेही तिथे होते. दरम्यान यवतमाळ येथून विवाहितेला नागपूरच्या मेयो हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथेही कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमक्ष तिने जबानी दिली. त्यातही पती व सासूने जाळल्याचे सांगितले. उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडगाव रोड पोलीस ठाण्यात पती, सासू व नणंदेविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. तपास करून पोलीस उपनिरीक्षक सारंग मिरासे यांनी दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले.
सरकारी पक्षाच्या वतीने एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने पती प्रशांत लुटे याला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सासू अनुराधा लुटे हिचा मृत्यू झाल्याने तिच्या विरूद्धची तक्रार अबेट झाली. नणंद शामला उर्फ रंजना घरजारे (४०, रा. बडनेरा) हिला तीन महिने शिक्षा व एक हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली.